जळगावात बनावट नफा दाखवून २५ लाखांची फसवणूक
जळगाव , 07 जानेवारी (हिं.स.) व्हॉट्सअॅपवरील गुंतवणूक ग्रुपमध्ये अॅड करून दीड कोटी रुपयांचा नफा झाल्याचे बनावट स्क्रीनशॉट पाठवत एका तरुणाकडून टप्प्याटप्प्याने तब्बल २५ लाख ३० हजार ५०० रुपये उकळल्याची धक्कादायक सायबर फसवणूक उघडकीस आली आहे. या प्रकरण
जळगावात बनावट नफा दाखवून २५ लाखांची फसवणूक


जळगाव , 07 जानेवारी (हिं.स.) व्हॉट्सअॅपवरील गुंतवणूक ग्रुपमध्ये अॅड करून दीड कोटी रुपयांचा नफा झाल्याचे बनावट स्क्रीनशॉट पाठवत एका तरुणाकडून टप्प्याटप्प्याने तब्बल २५ लाख ३० हजार ५०० रुपये उकळल्याची धक्कादायक सायबर फसवणूक उघडकीस आली आहे. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पारोळा येथील रहिवासी सागर गोविंद सोनार (३३) हे धुळे येथील एका खासगी आस्थापनेत अकाउंटंट म्हणून कार्यरत आहेत. दिनांक ५ नोव्हेंबर २०२५ रोजी त्यांना एका अनोळखी मोबाईल क्रमांकावरून अचानक एका व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये अॅड करण्यात आले. या ग्रुपमध्ये शेअर मार्केट व ऑनलाईन गुंतवणुकीतून मोठ्या प्रमाणात नफा झाल्याचे आकर्षक स्क्रीनशॉट नियमितपणे पाठविले जात होते. त्याचबरोबर एका लिंकवर क्लिक करून अकाउंट ओपन करण्यास सांगण्यात आले होते. सायबर गुन्हेगारांनी सोनार यांना गुंतवणुकीसाठी युजर आयडी व पासवर्ड दिला. त्यानुसार त्यांनी १५ दिवसांच्या प्लॅनमध्ये सुरुवातीला १० लाख रुपये गुंतवणूक म्हणून भरले. त्यानंतर त्यांच्या अकाउंटमध्ये तब्बल १ कोटी ५० लाख रुपयांचा नफा झाल्याचे ऑनलाईन दाखविण्यात येत होते. मात्र, ही रक्कम प्रत्यक्षात काढता येत नसल्याने संशय निर्माण झाला. वेगवेगळ्या खात्यांवर पैसे उकळले दरम्यान, नफा काढण्यासाठी विविध कारणे सांगत सायबर भामट्यांनी सोनार यांच्याकडून वेळोवेळी वेगवेगळ्या बँक खात्यांवर एकूण २५ लाख ३० हजार ५०० रुपये ऑनलाईन ट्रान्सफर करून घेतले. पैसे स्वीकारताना परकीय चलन विनिमय, आंतरराष्ट्रीय व्यवहार शुल्क, कमिशन अशा विविध कारणांचे मेसेज त्यांना पाठविले जात होते. पैसे ट्रान्सफर केल्यानंतर दुसऱ्या दिवशी ‘परकीय चलन व्यवहारामुळे मुख्य कार्यालयाला माहिती देण्यात आली असून, त्यासाठी १२ टक्के शुल्क भरण्यात मदत केली जाईल व उर्वरित ८ टक्के रक्कम तुम्हाला भरावी लागेल,’ असा संदेश पाठविण्यात आला. तसेच दाखविण्यात आलेला दीड कोटी रुपयांचा नफा काढण्यासाठी पुन्हा १० टक्के कमिशन भरण्याची मागणी करण्यात आली. यासाठी सोनार यांनी १५ लाख रुपये उसनवारीने घेऊन आरटीजीएसद्वारे भरले. इतकी रक्कम भरूनही नफा तर दूरच, मूळ गुंतवणूकही परत मिळत नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आपली फसवणूक झाल्याची खात्री सागर सोनार यांना झाली. अखेर त्यांनी सायबर पोलिस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दाखल केली. त्यावरून दोन अनोळखी सायबर गुन्हेगारांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande