
नांदेड, 07 जानेवारी (हिं.स.) धर्माबाद शहरातील गोरगरीब जनतेला आपल्या हक्काचे घर असावे, यासाठी नवनिर्वाचित नगराध्यक्षा संगिताताई बोल्लमवाड यांनी हालचाली सुरू केल्या आहेत. लवकरच म्हाडाची घरकूल योजना राबविण्यासाठी शासनस्तरावर त्यांनी पाठपुरावा सुरू केला आहे. सदर योजेनेचा लाभ घेण्यासाठी त्यांनी गोर गरीब जनतेला आवाहन करीत नगर परिषद कार्यालयात नाव नोंदणी करून घेण्याचे सांगितले आहे. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी शहरातील गोरगरीब जनता नगरपरिषद कार्यालयात गर्दी करीत असल्याचे चित्र दिसत आहे.
मराठवाडा जनहित पार्टीचे संस्थापक अध्यक्ष शंकर बोलमवाड यांनी नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारात शहरातील गोरगरीब जनतेला आपल्या हक्काचे घर मिळून देण्याचे आश्वासन दिले होते. निवडणुकीत शहरातील मतदारांनी मराठवाडा जनहित पार्टीच्या नगराध्यक्षसह १५ नगरसेवक मोठ्या मताधिक्याने निवडून दिले आहेत. जनतेने मराठवाडा जनहित पार्टीवर
दाखविलेल्या विश्वासास तडा जाऊ देणार नाही. असे मराठवाडा जनहित पार्टीचे संस्थापक अध्यक्ष शंकर बोल्लमवाड यांनी स्पष्ट केले आहे. या आश्वासनाची पूर्तता करण्यास नगराध्यक्ष संगीता बोलमवाड व भावी उपनगराध्यक्ष शंकर बोलमवाड, सर्व नगरसेवक प्रयत्नशील आहेत. शासनाची म्हाडाची घरकूल योजना राबविण्यासाठी बाळापूर परीसरात मोठ्या प्रमाणावर गायराण जमीन असून सदर जमिनीची पाहणी करण्यात आली आहे. या गायरान जमिनीची भूमी अभिलेख कार्यालयामार्फत लवकरच नियमानुसार मोजणी करून घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. नगरपरिषदेच्या सभागृहात तसा ठराव एकमताने मंजूर करून घेण्यात येणार आहे. त्यामुळे शहरातील बेघर असलेल्या गोरगरीब जनतेने नगरपरिषदेत नाव नोंदणी करून घेण्याचे आवाहन नगराध्यक्ष संगीता बोलमवाड यांनी केले आहे. ही नाव नोंदणी मोफत होत असून त्यासाठी लाभार्थीनी आधार कार्ड व बँकेचे पासबुक सोबत आणावे, असेही त्यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis