
रायगड, 07 जानेवारी (हिं.स.)। रायगड जिल्ह्यात दरोडा, घरफोडी व चोरीच्या घटनांनी चिंताजनक स्वरूप धारण केले असून गुन्हेगारीचा आलेख सातत्याने वाढताना दिसत आहे. २०२४च्या तुलनेत २०२५ या वर्षात दरोड्यांचे प्रमाण वाढले असून, चोरीच्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यात पोलीस प्रशासनाला अपेक्षित यश आलेले नाही.
रायगड जिल्ह्यात २०२५ मध्ये दरोडा, जबरी चोरी, घरफोडी व चोरीचे एकूण ४४५ गुन्हे दाखल झाले आहेत. यापैकी २९५ गुन्ह्यांमध्ये आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले असले तरी १५० गुन्ह्यांतील आरोपी अद्याप फरार आहेत.
दिवसाढवळ्या घरांची टेहळणी करून रात्रीच्या अंधारात चोरी करण्याची पद्धत चोरट्यांकडून मोठ्या प्रमाणावर वापरली जात आहे. चोरी झालेल्या परिसरात दिवसभर संशयास्पद हालचाली होत असल्याची माहिती स्थानिक नागरिकांकडून पोलिसांना मिळत आहे. शहरांसह ग्रामीण भागात बंद घरांवर लक्ष ठेवून रात्री घरफोडी करून लाखो रुपयांचा मौल्यवान मुद्देमाल लंपास केला जात आहे. मात्र अनेक प्रकरणांत गुन्हे उघडकीस आणण्यात पोलीस प्रशासनाला मर्यादा येत असल्याचे चित्र आहे.
गुन्हे रोखण्यासाठी पोलिसांनी रात्रीची गस्त वाढविली असून प्रत्येक हद्दीत पोलिस उपस्थिती बळकट करण्याच्या सूचना वरिष्ठ स्तरावरून देण्यात आल्या आहेत. तसेच बाहेरगावी जाणाऱ्या नागरिकांनी पोलिस ठाण्यात पूर्वकल्पना द्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे. तरीदेखील घरफोड्यांचे सत्र सुरूच असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मागील काही वर्षांच्या तपासातून जिल्ह्याबाहेरील व परराज्यातील टोळ्या रायगडमध्ये सक्रिय असल्याचे स्पष्ट झाले आहे. सकाळी जिल्ह्यात प्रवेश करून दिवसभर टेहळणी करणे आणि रात्री चोरी करून जिल्ह्याबाहेर पसार होणे, ही त्यांची कार्यपद्धत असल्याने गुन्ह्यांची उकल करणे पोलिसांसाठी मोठे आव्हान ठरत आहे.
वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांनी प्रभावी पोलिस बंदोबस्त, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि ठोस कारवाईची मागणी केली असून रायगड पोलीस प्रशासनाकडून कडक पावले उचलली जातील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
---------------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके