
जळगाव, 07 जानेवारी, (हिं.स.) न्यायालयाचे पकड वॉरंट बजावणीकरिता गेलेल्या पोलिसांवर तरुणाने चाकू उगारून धक्काबुकी केल्याची घटना जळगावमधील गुजराल पेट्रोल पंपाजवळील हटिल पूजा येथे घडली. यादरम्यान आरोपी नितेश उर्फ गोल्या मिलिंद जाधव (रा. पिंप्राळा) ने पोबारा केला. मात्र पोलिसांनी पाठलाग करून त्याला पकडले असून त्याच्याविरोधात रामानंद पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल झाला.पकड वॉरंट असलेला नितेश जाधव हा गुजराल पेट्रोलपंप जवळील एका हॉटेलमध्ये असल्याची माहिती एलसीबीचे कॉन्स्टेबल महेश सोमवंशी यांना मिळाली, ते आणि उपनिरीक्षक शरद बागल हे हॉटेलमध्ये पोहचले.
पोलिसांनी नितेशला न्यायालयाच्या पकड वॉरंटनुसार अटक होण्यास सांगितले. मात्र, त्याने सोबत येण्यास नकार देत अरेरावी करून उपनिरीक्षक बागल यांची कॉलर पकडून धक्काबुक्की केली. धारदार चाकूने सोमवंशी यांच्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. वार चुकवित असताना पोलिसांच्या हातून निसटून त्याने पळ काढला. पोलिसांनी पाठलाग करून त्याला पकडले. त्याला रामानंदनगर पोलिसांच्या ताब्यात दिले आणि वॉरंट बजावून अटक केली. त्याच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर