छ. संभाजीनगर शहरातील भाज्यांचे दर काही प्रमाणात स्वस्त
छत्रपती संभाजीनगर, 07 जानेवारी (हिं.स.) छत्रपती संभाजी नगर शहरातील भाज्यांचे दर काही प्रमाणात कोसळत आहेत. हिरव्या वाटाण्याचे दर २०० रुपये किलोवरुन अलीकडे ५० रुपये किलोपर्यंत आले होते. हेच दर आता तर ४० रुपये किलोपर्यंत आले आहेत. विशेष म्हणजे मागच्य
छ. संभाजीनगर शहरातील भाज्यांचे दर काही प्रमाणात स्वस्त


छत्रपती संभाजीनगर, 07 जानेवारी (हिं.स.)

छत्रपती संभाजी नगर शहरातील भाज्यांचे दर काही प्रमाणात कोसळत आहेत. हिरव्या वाटाण्याचे दर २०० रुपये किलोवरुन अलीकडे ५० रुपये किलोपर्यंत आले होते. हेच दर आता तर ४० रुपये किलोपर्यंत आले आहेत. विशेष म्हणजे मागच्या अनेक आठवड्यांपासून १०० रुपये पाव किलोने विकला जात असलेला शेवगा ८० रुपयांनी विकला गेला. साहजिकच पुढील काळात हेच दर आणखी कमी होण्याची आशा पल्लवीत झाली आहे. तर, इतर भाज्यांचे दर बऱ्यापैकी स्थिर आहेत.

सद्यस्थितीत बाजारात हिरवा वाटाणा मोठ्या प्रमाणावर दिसून येत असून, बाहेर जिल्ह्यांतील शेतकरी व विक्रेतेही शहरात वाटाण्याची विक्री करण्यासाठी येत असल्याचे पाहायला मिळत आहे. आवक वाढल्यामुळेच कॅप्सुल वाटाणा

थेट ४० रुपये किलोने किरकोळ बाजारात विकला जात आहे. त्यामुळे वाटाण्याचा बहार संपण्याआधी भाव आणखी कमी होतात की काय, अशीही शक्यता विक्रेत्यांकडून व्यक्त केली जात आहे. एकीकडे बाजारात पालेभाज्यांची आवक बरीच वाढली आहे आणि १० रुपयांना जुडी, तर १५ रुपयांना दोन जुड्या, या प्रमाणे अनेक वसाहतींमध्ये विक्री होत आहे. तर, काही भागात यापेक्षाही स्वस्त दराने विक्री होत असल्याचे पाहायला मिळत आहे. पुन्हा पालेभाज्यांची 'व्हरायटी'ही आता मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत आहे.

अनेक आठवड्यांपासून २५० ग्रॅमसाठी १०० रुपये मोजायला लावणारा शेवगा ८० रुपयांवर आल्याचे पाहायला मिळाले. यापुढील काळात मात्र शेवग्याचे दर आणखी कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

गवारीचे दर मात्र कमी होण्याच्या स्थितीत नाही आणि त्यामुळेच अजूनही २५० ग्रॅम गवारीसाठी ४० रुपये मोजावे लागत आहेत. दरम्यान, इतर फळभाज्यांचे भाव २५० ग्रॅममागे २० ते ३० रुपयांवर स्थिर असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचाच भाग म्हणून मस्का फल्ली, दोडके, श्रावण घेवडा, सिमला मिरची, आले आदींची २५० ग्रॅममागे ३० रुपयांनी, तर फुलकोबी, पत्ताकोबी, गिलके, कारले, वांगी, भेंडी, चवळी, दुधी भोपळा, लाल भोपळा, डिंगऱ्या, लिंबू आदींची २५० ग्रॅममागे २० रुपयांनी मंगळवारी विक्री झाली. अलीकडे गाजराची आवकही वाढली आहे आणि त्यामुळे गाजराची ४० रुपये किलोने विक्री होताना दिसून येत आहे. कांदे-बटाटे ४० रुपये किलोप्रमाणे विकले जात असले तरी बाजारातील बहुतांश कांदा ओला आहे व त्यामुळे खराब निघण्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. टोमॅटोचे दर वधारलेले आहेत व ६० रुपये किलोच्या घरात भाव पोहोचला आहे. तर, अनेक दिवसांपासून लसूण २५० ग्रॅममागे ७० ते ८० रुपयांवर स्थिर असल्याचा दिलासा आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande