
नवी मुंबई, 08 जानेवारी, (हिं.स.)। नवी मुंबई महानगरपालिका निवडणूकीमध्ये सर्व नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावावा याकरिता स्वीप कार्यक्रमांतर्गत महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबविण्यात येत असून आज नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक 36 व 122 कोपरखैरणे गाव येथील 1100 हून अधिक विद्यार्थी, शिक्षक व पालकांनी एकत्र येत भव्यतम मानवी साखळी तयार करुन 15 जानेवारी रोजीच्या महापालिका निवडणूकीत मतदान करण्याचे आवाहन केले.
निवडणूक विषयक स्वीप कार्यक्रमांचे नोडल अधिकारी उपआयुक्त डॉ. अजय गडदे आणि शिक्षण विभागाच्या उपआयुक्त श्रीम. संघरत्ना खिल्लारे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण विस्तार अधिकारी श्रीम. सुलभा बारघरे व केंद्र समन्वयक श्री. जयप्रकाश सिंह यांच्या नियंत्रणाखाली हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला.
‘मतदार राजा जागा हो – लोकशाहीचा धागा हो’, ‘माझे मत माझा अधिकार’, ‘वोट कर नवी मुंबईकर’, ‘वोट करा वोट करा – आमच्या भविष्यासाठी वोट करा’ – अशा विविध प्रकारच्या घोषणा देत तसेच वेगवेगळया प्रकारची घोषवाक्य लिहीलेले फलक उंचावत विद्यार्थ्यांनी कोपरखैरणे परिसर दणाणून सोडला. विद्यार्थ्यांमार्फत त्यांच्या पालकांमध्ये व मतदारांमध्ये मतदान करण्याविषयी व्यापक स्वरुपात जनजागृती करण्यात येत असून त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे.
या वर्षी प्रथमत:च महापालिकेची निवडणूक बहुसदस्यीय पध्दतीने होत असून 1 ते 27 क्रमांकाच्या प्रभागातील प्रत्येक मतदाराला प्रभागातील अ, ब, क, ड अशा 4 जागांसाठी प्रत्येकी एक याप्रमाणे मतदान करावयाचे आहे. तसेच 28 क्रमांकाच्या प्रभागातील प्रत्येक मतदाराला प्रभागातील अ, ब, क अशा 3 जागांसाठी प्रत्येकी एक याप्रमाणे मतदान करावयाचे आहे. या विषयी नागरिकांमध्ये बहुसदस्यीय पॅनल पध्दतीत कसे मतदान करावयाचे याबाबत माहितीपत्रके वितरीत करुन, ठिकठिकाणी बॅनर प्रदर्शित करुन, डिजीटल बॅनरव्दारे प्रसिध्दी करुन, सिनेमागृहांमध्ये व्हिडीओ चित्रफिती प्रसारित करुन, विविध समाज माध्यमांवरुन चित्रफितींव्दारे माहिती दिली जात आहे.
नवी मुंबई महानगरपालिका स्वीप कार्यक्रमांतर्गत अनेक अभिनव उपक्रम राबवित असून त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. कोपरखैरणे गाव शाळा क्रमांक 36 व 122 यांनी परिसरात रॅली काढून तसेच भव्यतम मानवी साखळी करुन राबविलेल्या अभिनव उपक्रमालाही उत्तम प्रतिसाद लाभला.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर