
रत्नागिरी, 8 जानेवारी, (हिं. स.) : राजापूर लांजा तालुका नागरिक संघ आणि रिंगणे, कोंडगे, कुरंग, झर्ये, आरगाव, झर्ये ग्रामस्थांनी आयोजित केलेले अकरावे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन रिंगणे (ता. लांजा) येथे ३० जानेवारी ते १ फेब्रुवारी २०२६ या काळात होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन होणार आहे.
दशकभरात स्वतःची वेगळी ओळख जपत कोकणातील ग्रामीण साहित्याची चळवळ नव्याने बांधण्यासाठी पुढाकार घेतलेल्या, सामाजिक बांधिलकीचे अधिष्ठान असलेल्या राजापूर लांजा तालुका नागरिक संघाने यावर्षीचे अकरावे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्याचा मान सह्याद्री पायथ्याशी वसलेल्या लांजा तालुक्यातील निसर्गरम्य रिंगणे गावाला दिला आहे. ग्रामीण साहित्य संमेलनाचे हे अकरावे वर्ष असून या संमेलनाचा कार्यक्रम ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या निसर्गसंपन्न रिंगणे या गावी ३० जानेवारी ते १ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत होणार आहे.
साहित्य संमेलनाला नाटककार ला. कृ. आयरे साहित्य नगरी असे नाव देण्यात येणार आहे. संमेलनात नवोदित साहित्यिकांना प्रोत्साहन देण्याचे काम होणार आहे. क्रांतीज्योत, ग्रंथदिंडी, पुस्तक प्रदर्शन, व्याख्याने, काव्यसंमेलन, सांस्कृतिक कार्यक्रम, विविध पुरस्कार वितरण असे भरगच्च कार्यक्रम असलेले हे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन जितके अधिक उठावदार होईल तेवढेच रिंगणे गाव व परिसर अधिक प्रकाशात येईल. यासाठी संघाचे मुंबईचे व स्थानिक कार्यकर्ते तसेच रिंगणे व परिसरातील गावातील ग्रामस्थ ही मेहनत घेत आहेत. कार्यक्रमात साहित्यिक, कलाकार व विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घ्यावा. असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
संमेलनात कोकण भूषण पुरस्कार मालवणमधील वराड गावचे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे व्यंगचित्रकार प्रभाकर वाईरकर यांना दिला जाणार आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सतारवादक विदुर महाजन यांचे सतारवादन आणि मुलाखत हे संमेलनाचे वैशिष्ट्य आहे.
संमेलनात चित्रकार विजयराज बोधनकर यांचे चित्र प्रदर्शन, व्यंगचित्रकार प्रभाकर वाईरकर यांचे चित्रप्रदर्शन, निकेत पावसकर यांचे अक्षरघर, सुनील कदम यांचे शस्त्रप्रदर्शन, महाराष्ट्र पाठ्यपुस्तक मंडळाचे पुस्तक प्रदर्शन, मुलांचे चित्र प्रदर्शन, रांगोळी प्रदर्शन, पाककला प्रदर्शन आणि दिवाळी अंकांचे प्रदर्शन भरणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी