
मुंबई, 09 जानेवारी (हिं.स.)। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर भाजप आणि शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांत तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. वॉर्ड क्रमांक १७३ मध्ये शुक्रवारी प्रचारादरम्यान दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमनेसामने आले आणि या वेळी भाजपच्या कार्यकर्त्यांकडून माईकवरून ‘५० खोके एकदम ओके’च्या घोषणा देण्यात आल्या.
आतापर्यंत ही घोषणाबाजी ठाकरे गटाकडून शिंदे गटाला उद्देशून केली जात होती; मात्र स्वतःच्या मित्रपक्षाकडूनच अशी घोषणाबाजी झाल्याने शिंदे सेनेचे कार्यकर्ते संतापले आणि त्यांनीही भाजपविरोधात घोषणाबाजी केली. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सामाजिक माध्यमांवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला असून मतदानाला काहीच दिवस बाकी असताना घडलेली ही घटना राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.
वॉर्ड क्रमांक १७३ हा जागावाटपात शिंदे सेनेला मिळाल्याने येथे पूजा कांबळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र भाजपच्या शिल्पा केळुस्कर यांनीही एबी फॉर्म जोडून अर्ज भरला आणि तो वैध ठरला. त्यामुळे या वॉर्डमध्ये दोन्ही पक्षांमध्ये मैत्रीपूर्ण लढत मान्य करण्यात आली होती. पण प्रचार सुरू झाल्यानंतर दोस्तीतील ही कुस्ती उघडपणे दिसू लागली आणि दोन मित्र पक्षांमध्ये फूट पडल्याची चर्चा रंगू लागली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया
कुठल्या कार्यकर्त्यांनी काय घोषणा दिल्या हे मला माहिती नाही. पण शिवसेना-भाजप मुंबईत मोठ्या ताकदीने लढत आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
या घडामोडींवर शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत ज्यांनी घोषणा दिल्या त्यांच्यावर कारवाईची अपेक्षा व्यक्त केली आणि या प्रकरणाची दखल घेण्याचे आवाहन फडणवीसांना केले.
घोषणा देणारे दत्ता केळुस्कर काय म्हणाले?
आमच्या तोंडातून थोडासा चुकीचे शब्द निघाले. त्यांनी जी प्रॉपर्टी जाहीर केली आहे त्यानुसार 50 खोके नाही तर 'अकरा खोके एकदम ओके', अशी घोषणा द्यायला हवी. त्याची जंगम प्रॉपर्टी 11 कोटी आली कुठून?? त्यामुळे आम्ही नवी घोषणा सुरू केली आहे. ही घोषणा फक्त आमचे मित्र रामदास कांबळे आणि त्यांच्या उमेदवार पत्नी यांच्यासाठी आहे. त्यांच्यासाठी वैयक्तिक घोषणा आहे, त्यांच्या पक्षासाठी ही घोषणा नाही. ही लढाई होणारच आहे. कारण माझी तिकीट त्याने चोरली आणि लोकांना दाखवलं की त्याची तिकीट मी चोरली. उद्धव ठाकरे यांच्या पक्षातून त्याने शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला आणि तिकीट घेतलं, असे दत्ता केळुस्कर यांनी म्हटले. दरम्यान, मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील 29 महापालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान होणार असून 16 जानेवारील मतमोजणी होईल.
दरम्यान, भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनीही घोषणाबाजी करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. आता या प्रकरणावर दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते कोणता तोडगा काढतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule