
मुंबई, 08 जानेवारी (हिं.स.) - चेन्नईत जसा तमिळ महापौर होतो, तसा मुंबईत मराठी महापौरच होणार. ज्यांच्या अंगात छत्रपती शिवरायांचे रक्त आहे आणि जे त्यांच्या विचारांवर चालतात, ते सर्व मराठी आहेत. तसेच बाहेरून आले म्हणून काय झाले, जे इथे स्थायिक झाले आहेत, ते सर्व मुंबईकर आहेत, मग त्यांची भाषा हिंदी असो. आपण सर्व हिंदू म्हणून एक आहोत आणि हिंदुत्व हाच आमचा आत्मा आहे, अशा स्पष्ट शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी महानगरपालिका निवडणुकीनंतरचे धोरण स्पष्ट केले. ते एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलत होते.
मुंबईच्या विकासाबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की, आम्ही घरांची डिलिव्हरी सुरू केली असून नवीन डेव्हलपर्सना संधी दिली आहे. मला पूर्ण विश्वास आहे की, येत्या ७ ते ८ वर्षांत मुंबई पूर्णपणे स्लम फ्री (झोपडपट्टीमुक्त) होईल. पाणी तुंबण्याची समस्या सोडवण्यासाठी १०० टक्के पंपिंग स्टेशन्सचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. उद्धव ठाकरेंनी मेट्रो प्रकल्पात योगदान देण्यास नकार दिला होता, तेव्हा आम्ही एमएमआरडीएच्या माध्यमातून कामे पूर्ण केली. एमएमआरडीएने बीएमसीच्या कोणत्याही अधिकारावर गदा आणलेली नाही, उलट मुंबईचे इन्फ्रास्ट्रक्चर मजबूत केले आहे. या व्यतिरिक्त एमएमआरडीएने कोणतेही अतिक्रमण केलेले नाही. एकूणच या माध्यमातून बीएमसीचे अधिकार संपवण्याच्या आरोपाला त्यांनी आपल्या उत्तरातून पूर्णविराम दिला.
अवैध घुसखोरांच्या मुद्द्यावर ते म्हणाले, आम्ही केवळ बोलत नाही, तर कृती करतो. बांगलादेशी घुसखोरांना डिपोर्ट (देशातून बाहेर काढणे) करण्यात महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर आहे. येणाऱ्या काळात एकाही बांगलादेशी घुसखोराला मुंबईत राहू देणार नाही, त्यांना वेचून बाहेर काढू, असा इशाराही त्यांनी दिला.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी