
नवी दिल्ली, 14 मार्च (हिं.स.) - सुरुवातीला भारताशी संपर्क स्थापित करण्यात काही अडचणी होत्या, परंतु आता दोन्ही देश (भारत आणि इराण) एकमेकांना सहकार्य करत आहेत. दोन्ही देशांमधील दीर्घकालीन मैत्रीपूर्ण संबंध आणि सामायिक हितसंबंध लक्षात घेऊन पश्चिम आशियातील सुरू असलेल्या संघर्षादरम्यान काही भारतीय जहाजांना होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाण्याची परवानगी देण्यात आली आहे, असे महत्वपूर्ण विधान इराणचे भारतातील राजदूत मोहम्मद फताली यांनी केले.
इराणी राजदूत मोहम्मद फताली यांनी माध्यमांना दिलेल्या एका विशेष मुलाखतीत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, हो, आम्ही काही जहाजांना होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाण्याची परवानगी दिली आहे, परंतु सध्या किती जहाजांना परवानगी देण्यात आली आहे हे आम्ही सांगू शकत नाही. या विषयावर अधिक माहिती दिली जाईल. इराण आणि भारताचे ऐतिहासिक संबंध आणि सामायिक हितसंबंध आहेत. शुक्रवारी, इराणने दोन भारतीय ध्वजांकित एलपीजी वाहक जहाजांना होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाण्याची परवानगी दिली. २८ फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्ला केल्यानंतर आणि इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांची हत्या झाल्यानंतर सामुद्रधुनी प्रभावीपणे बंद करण्यात आली.
भारत सरकारने आम्हाला खरोखरच मोठी मदत केली आहे. मी फक्त इराण आणि भारताबद्दल बोलेन. मी भारताचा इराणी राजदूत आहे. तिसऱ्या देशाबद्दल (श्रीलंका) मी भाष्य करणार नाही. एक राजदूत म्हणून मला प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने पाहावे लागते. या जहाजांच्या बाबतीत भारत सरकारने आम्हाला मोलाचे सहकार्य केले. त्यांनी आमची विनंती मान्य केली, पण दुर्दैवाने इतर काही देशांनी सहकार्य करण्यास नकार दिला. या सर्वाचा विचार करता, आम्ही निश्चितपणे अमेरिकेला चोख प्रत्युत्तर देऊ. त्यातील काही भाग आम्ही पूर्ण केला आहे. लवकरच तुम्हाला चांगली बातमी ऐकायला मिळेल. इराण कोणतीही कारवाई प्रत्युत्तराशिवाय सोडत नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
यावेळी मोहम्मद फताली यांनी भारत-इराण संबंध अधिक मजबूत करण्याच्या गरजेवर भर दिला. जर दोन्ही देशांमध्ये कोणताही फरक निर्माण झाला, तर शत्रू त्याचा फायदा घेईल. दोन्ही बाजू या राजकीय आणि सामाजिक समस्या हाताळण्यासाठी पुरेसे परिपक्व आहेत. भारताने आतापर्यंत इराणसोबतच्या युद्धाच्या मुद्द्यावर संतुलित राजनैतिक भूमिका स्वीकारली आहे, असेही ते म्हणाले.
'होर्मुझची सामुद्रधुनी'चे महत्व
'होर्मुझची सामुद्रधुनी' ही जगातील सर्वात महत्वाच्या सागरी मार्गांपैकी एक आहे, ही जागतिक तेल पुरवठ्यापैकी सुमारे २० टक्के पुरवठा करते. हा मार्ग बंद झाल्यामुळे भारतासाठी एक मोठी समस्या निर्माण झाली आहे, या मार्गाने सुमारे ४० टक्के कच्चे तेल, ५० टक्क्यांहून अधिक एलएनजी आणि जवळजवळ ९० टक्के एलपीजी आयात करतो. या महत्त्वाच्या मार्गावरील असंख्य जहाजांच्या अडथळ्यामुळे देशात एलपीजीच्या कमतरतेचे संकट निर्माण झाले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी