
लातूर, 08 जानेवारी (हिं.स.)।
छत्रपतींच्या घराण्याविषयी तमाम महाराष्ट्राला नितांत आदर आहे. छत्रपतींना पहायला, भेटायला आणि बोलायला मिळणे हे तर भाग्यच समजल जात. पण गुरुवारी लातूरकरांना वेगळाच अनुभव आला. साक्षात छत्रपती लातूरच्या बाजारपेठेत सामान्य नागरिकांसोबत बसून चहा-पान करताना आणि नाष्ट करताना दिसले. हे दृश्य पाहून लातूरकर हरपून गेले. छत्रपतींसोबत फोटो काढायला, सेल्फी घ्यायला झुंबड उडाली.
गुरुवारी सकाळी सामान्य लातूरकर आपल्या दिनक्रमात व्यस्त होते. सकाळची वेळ असल्याने सर्व हॉटेलांमध्ये नाष्ट्यासाठी गर्दी पडलेली होती. तेवढ्यात शहरातील नामांकित तुळजाई इडली गृहासमोर गाड्यांचा ताफा थांबला. सहाजिकच गर्दीचे लक्ष तिकडे गेले. या वाहनातून जिल्ह्याचे पालकमंत्री छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले, माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर, डॉ. सौ. अर्चनाताई पाटील चाकूरकर, शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर आदी मान्यवर उतरले. हे सर्वजण थेट तुळजाई इडलीगृहात दाखल होत असलेले पाहून नागरिकही अचंबित झाले. हॉटेलमध्ये जावून छत्रपतींसह मान्यवरांनी सामान्य नागरिकांसमवेत बसून नाष्टा केला. लातूरकरांच्या हाताची चव छत्रपतींनीही चाखली. सामान्य लातूरकरांशी चर्चाही केली. लातूरकरांच्या अडीअडचणी व समस्या जाणून घेतल्या. छत्रपतींना पाहून सेल्फी घेण्यासाठी युवकांनी मोठी गर्दीही केली.
विविध ठिकाणच्या बैठका आटोपून हे मान्यवर दुपारच्या वेळी न्यायालयाच्या पाठीमागील बाजूस खोरी गल्लीत असणाºया साई टी हाऊस येथे दाखल झाले. तेथे त्यांनी चहापान केले. पालकमंत्री भोसले यांना पाहून हॉटेलमध्ये प्रचंड गर्दी जमा झाली. पालकमंत्री ना. भोसले व आ. संभाजी पाटील यांनी प्रत्येकाशी संवाद साधला. या परिसरात चहापानासाठी येणारे वकील तसेच परिसरातील रहिवाशांनी पालकमत्र्यांसोबत छायाचित्रे काढली.
नाव आणि पद मोठे असले तरी छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले, आ. संभाजी पाटील निलंगेकर हे सामान्य नागरिकांमध्ये मिसळून वावरत असल्याचे पाहून लातूरकरांना सुखद धक्का बसला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis