

* चाइल्ड हेल्प फाऊंडेशनतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा
मुंबई, 08 जानेवारी (हिं.स.) : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असलेल्या 'चाइल्ड हेल्प फाऊंडेशन' (CHF) या अग्रगण्य स्वयंसेवी संस्थेने नुकताच १४ आश्रमशाळांमध्ये जागतिक मानसिक आरोग्य दिन मोठ्या उत्साहात साजरा केला. शालेय आरोग्य उपक्रमाचा एक भाग म्हणून राबवण्यात आलेल्या या उपक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. मुलांमधील सुप्त गुणांना वाव देणे, त्यांना आपल्या भावना व्यक्त करण्यास प्रोत्साहन देणे आणि दैनंदिन जीवनात मानसिक आरोग्याचे महत्त्व पटवून देणे, हे या कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट होते.
या आगळ्यावेगळ्या सोहळ्यात विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मानसिक आरोग्यासारखा गंभीर विषय मुलांपर्यंत सोप्या भाषेत पोहोचवण्यासाठी संस्थेने विविध कलागुणांचा आधार घेतला. यावेळी १४ आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांनी गायन, अभिनय आणि घोषवाक्य स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली. विद्यार्थ्यांनी आशावाद आणि सकारात्मकता दर्शवणारी गाणी गाऊन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. तसेच, लघू नाटिकांच्या माध्यमातून दयाळूपणा, सहानुभूती आणि संकटकाळी एकमेकांना मदत करण्याचे महत्त्व पटवून दिले. विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांनी मानसिक आरोग्याविषयी जनजागृती करणारी अतिशय प्रभावी घोषवाक्ये तयार करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
या उपक्रमाविषयी बोलताना चाइल्ड हेल्प फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. शाजी वर्गीस म्हणाले की, मुलांच्या विकासाचा मानसिक स्वास्थ्य हा एक अत्यंत महत्त्वाचा पाया आहे. वयाला साजेश्या अशा विविध उपक्रमांतून आम्ही मुलांना हे सांगण्याचा प्रयत्न करतो की, त्यांच्या भावना महत्त्वाच्या आहेत आणि त्या व्यक्त करणे पूर्णपणे नैसर्गिक आहे. प्रत्येक मुलाला भावनिक आधार मिळेल असे सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी शिक्षक आणि शाळेतील कर्मचाऱ्यांनी मोलाची भूमिका बजावली. त्यांनी विद्यार्थ्यांना आपले विचार मनमोकळेपणाने मांडण्यासाठी प्रोत्साहित केले. चाइल्ड हेल्प फाऊंडेशनने आपल्या मानसिक आरोग्य उपक्रमाद्वारे आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून त्यांना सुरक्षित आणि आश्वासक वातावरण दिले आहे. भविष्यातील पिढीला अधिक सक्षम, आनंदी आणि सुदृढ बनवण्यासाठी 'चाइल्ड हेल्प फाऊंडेशन'चे हे कार्य अविरत सुरू असून, नागरिक व इतर संस्थांनी या मोहीमेत सहभागी होण्याचे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी