
ठाणे, 8 जानेवारी, (हिं.स.)। पोलीस स्थापनादिनानिमित्त सायबर गुन्ह्यांविरोधात जनजागृती करण्यासाठी सायबर पोलीस ठाणे, आम्ही Cycle प्रेमी फाउंडेशन आणि चित्रमेध व्हिजन यांच्या संयुक्त विद्यमाने आणि डिकोडटेक इंडस्ट्रियल ट्रेनिंग प्रा. लि. यांच्या सहकार्याने ठाण्यात सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीत २०० हून अधिक सायकलप्रेमी सहभागी झाले होते.
सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश वारके, आम्ही Cycle प्रेमी फाउंडेशनच्या संस्थापिका-अध्यक्ष प्रज्ञा म्हात्रे, सचिव दीपेश दळवी, डिकोडटेक इंडस्ट्रियल ट्रेनिंग प्रा. लि. व्यवस्थापकीय संचालिका रेश्मा जाधव (साळुंखे) तसेच चित्रमेध व्हिजनचे संचालक विशाल लाटे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅलीला सुरुवात झाली. सायबर पोलीस ठाणे येथून निघालेली ही रॅली टेंभी नाका, तलावपाळी, गजानन महाराज मठ चौक, हरीनिवास सर्कल, शाहू मार्केट, गोखले रोड, राम मारुती रोड, कोर्ट नाका असा मार्ग पार करत पुन्हा सायबर पोलीस ठाण्यात संपन्न झाली. रॅलीमध्ये दहा वर्षांच्या मुलांपासून ७२ वर्षांपर्यंतचे सायकल प्रेमी सहभागी होते. या रॅलीचे नेतृत्व अमोल कुळकर्णी, अजय भोसले, ज्ञानदेव जाधव, सुनील रोकडे, गुरुप्रसाद देसाई, निखिल शिवलकर, चंद्रशेखर जगताप, व विठ्ठल कांबळे, गायत्री रिठे यांनी केले. रॅलीनंतर प्रत्येक सायकलप्रेमीचा पोलिसांच्या विशेष पदकाने सन्मान करण्यात आला. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश वारके यांनी उपस्थितांना सायबर गुन्ह्यांबाबत मार्गदर्शन करत, तंत्रज्ञान सतत बदलत असल्याने स्वतः सजग राहणे अत्यावश्यक असून जनजागृती हाच सायबर गुन्ह्यांवर प्रभावी उपाय असल्याचे प्रतिपादन केले. सायकल रॅलीच्या माध्यमातून ठाणेकरांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करण्याचा हा उपक्रम नागरिकांनीही उत्स्फूर्तपणे स्वागत केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर