
तेहरान, 09 जानेवारी (हिं.स.)। इराणमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई यांचे भाषण प्रसारित करण्यात आले. तेहरानसह सर्व मोठ्या शहरांमध्ये आणि ग्रामीण भागात हे भाषण दाखवण्यात आले. इराणमध्ये झालेल्या आंदोलनांनंतर खामेनेई यांनी दिलेल्या पहिल्याच भाषणात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना आपल्या देशातील समस्यांकडे लक्ष देण्याचा सल्ला दिला.
इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला खामेनेई यांनी आपल्या संबोधनात स्पष्ट केले की, इराण परदेशी समर्थित कारवायांना, म्हणजेच दहशतवादी एजंट्सना, आपल्या देशात कधीही सहन करणार नाही. काही दंगेखोर सरकारी मालमत्तेचे नुकसान करून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना खुश करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. ट्रम्प यांना इशारा देताना खामेनेई म्हणाले, “ट्रम्प यांनी आपल्या देशाची चिंता करावी. इराण कोणत्याही परकीय दबावापुढे झुकणारा नाही.”
आपल्या भाषणात खामेनेई यांनी इराणच्या तरुणांना एकत्र राहण्याचे आणि एकता कायम ठेवण्याचे आवाहन केले. त्यांनी सांगितले, “एकता टिकवून ठेवा आणि सदैव सज्ज राहा, कारण एकजुटीने उभा असलेला राष्ट्र कोणत्याही शत्रू देशाला पराभूत करण्याची ताकद ठेवतो.”देशाला उद्देशून बोलताना त्यांनी आरोप केला की, “अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या हातावर एक हजाराहून अधिक इराणी नागरिकांचे रक्त लागले आहे.” हे विधान गेल्या वर्षी जून महिन्यात अमेरिकेने इराणच्या अणु सुविधांवर केलेल्या हल्ल्यांच्या संदर्भात होते.
खामेनेई पुढे म्हणाले, “इस्लामिक प्रजासत्ताक शेकडो-हजारो सन्माननीय लोकांच्या बलिदानातून सत्तेत आले आहे आणि विध्वंस घडवणाऱ्यांसमोर कधीही माघार घेणार नाही. राजधानीतील अशांततेचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, निदर्शक अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना खूश करण्यासाठी हे कृत्य करत आहेत. “ते त्यांना आनंदी ठेवू पाहतात. त्यांना देश कसा चालवायचा हे माहीत असते, तर त्यांनी स्वतःचा देश चालवला असता,” असेही खामेनेई म्हणाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode