
- हिंदी महासागरातील व्यापारी मार्गांच्या सुरक्षिततेवर मोठे प्रश्नचिन्ह
नवी दिल्ली, 04 मार्च (हिं.स.) : इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष आता भारताच्या सागरी वेशीपर्यंत येऊन धडकला आहे. युद्धाच्या पाचव्या दिवशी इस्रायलने इराणची राजधानी तेहरानला लक्ष्य करत भीषण बॉम्बहल्ला केला आहे. दरम्यान दुसरीकडे श्रीलंकेच्या समुद्र किनाऱ्याजवळ एका इराणी जहाजावर पाणबुडी हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात 101 कर्मचारी बेपत्ता असून 78 जण गंभीर जखमी झाले आहेत.
श्रीलंकेच्या नौदल आणि संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी श्रीलंकेच्या सागरी हद्दीत एका इराणी जहाजाला अज्ञात पाणबुडीने लक्ष्य केले. हा हल्ला इतका भीषण होता की, जहाजावरील 101 जण अद्याप बेपत्ता आहेत तर 78 जण गंभीर जखमी झाले आहेत. श्रीलंकेचे नौदल सध्या घटनास्थळी बचावकार्य राबवत आहे. या हल्ल्याने हिंदी महासागरातील व्यापारी मार्गांच्या सुरक्षिततेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आखाती देशांतील हे युद्ध आता भारताच्या शेजारी राष्ट्र असलेल्या श्रीलंकेच्या समुद्रापर्यंत पोहचल्याने भारताची चिंता वाढली आहे. हिंदी महासागरात होणारे हे हल्ले भारताच्या सागरी व्यापारासाठी आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोक्याची घंटा मानले जात आहेत. जर हा संघर्ष असाच वाढत राहिला, तर त्याचे पडसाद कच्च्या तेलाच्या किमतीवर आणि जागतिक अर्थव्यवस्थेवर उमटण्याची शक्यता आहे.
श्रीलंकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या माहितीनुसार, पाणबुडीच्या हल्ल्यानंतर इराणी जहाजावर असणाऱ्या 32 नागरिकांना सुखरुप वाचवण्यात यंत्रणांना यश मिळालं असून, त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आरोग्य मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार रुग्णालयात दाखल असलेल्यांपैकी एकाची प्रकृती गंभीर असून, त्यांच्यावर पुढील उपचार सुरू आहेत.
परराष्ट्र मंत्र्यांनी श्रीलंकेतील संसदेला दिलेल्या माहितीनुसार, देशातील नौदलाला 180 नागरिक असणाऱ्या एका जहाजावर आयआरआयआयएस डेनामध्ये IRIS Dena (hull number 75) संकट ओढावलं असून, ही माहिती मिळताच तातडीनं बचावकार्यासाठी घटनास्थळी जहाजं आणि वायुदलाची विमानं पाठवण्यात आली. या जहाजावर झालेल्या भीषण हल्ल्यानंतर बेपत्ता नागरिकांचा आकडा मोठा असून, आता त्या संदर्भातील नवी माहिती केव्हा समोर येते याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.
अधिक माहिती अशी की, १८० कर्मचारी असलेल्या या इराणी फ्रिगेटवरून पहाटेच्या सुमारास आपत्कालीन मेसेज पाठवण्यात आला होता. ही नौका श्रीलंकेच्या किनाऱ्यापासून साधारण २५ मैल दक्षिणेला असताना अचानक मोठा स्फोट होऊन बुडू लागली. श्रीलंकेच्या संरक्षण मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, हा स्फोट एका अज्ञात पाणबुडीने केलेल्या हल्ल्यामुळे झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे.
हा हल्ला नेमका कोणी केला, याबाबत अद्याप अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. मात्र, श्रीलंकेच्या संसदेत विरोधी पक्षाच्या खासदारांनी हा इस्रायल-अमेरिका आणि इराण यांच्यातील सुरू असलेल्या संघर्षाचा भाग तर नाही ना? असा प्रश्न उपस्थित केला आहे. सरकारने यावर अद्याप कोणतेही थेट भाष्य केलेले नाही, पण आम्ही आंतरराष्ट्रीय सागरी कायद्यानुसार मदतीचे कर्तव्य बजावत आहोत, असे श्रीलंकेच्या नौदलाचे प्रवक्ते बुद्धिका संपथ यांनी स्पष्ट केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी