शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांविरोधात लातूर पोलिसांची कारवाई
लातूर, 09 जानेवारी (हिं.स.)। सार्वजनिक आरोग्याला गंभीर धोका निर्माण करणाऱ्या तसेच तरुण पिढीचे भवितव्य उद्ध्वस्त करणाऱ्या महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांच्या अवैध वाहतूक व विक्रीविरोधात लातूर पोलिसांनी क
महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांविरोधात लातूर पोलिसांची कारवाई – स्थानिक गुन्हे शाखेचा धडाका.


लातूर, 09 जानेवारी (हिं.स.)। सार्वजनिक आरोग्याला गंभीर धोका निर्माण करणाऱ्या तसेच तरुण पिढीचे भवितव्य उद्ध्वस्त करणाऱ्या महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांच्या अवैध वाहतूक व विक्रीविरोधात लातूर पोलिसांनी कठोर भूमिका घेत कारवाई केली आहे. या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी सुमारे रु. 11,09,496/- किमतीचा मुद्देमाल जप्त करून अवैध धंदे करणाऱ्यांना कडक संदेश दिला आहे.

स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांना गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की, उदगीर शहरातील उमा चौक ते शिवाजी चौक परिसरात एका पांढऱ्या रंगाच्या टोयोटा ईटॉस कारमधून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेले गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ विक्रीसाठी वाहतूक करण्यात येत आहे.सदर माहितीचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तत्काळ कारवाईस रवाना झाले.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथक उमा चौक परिसरात सापळा लावून उभे असताना वर्णनास जुळणारी टोयोटा ईटॉस कार क्रमांक MH-24-AF-4600 घटनास्थळी येताच पोलिसांनी तिला थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांची चाहूल लागताच वाहनचालकाने गाडी वेगात पळवून नेण्याचा प्रयत्न केला व एका ठिकाणी गाडीला धक्का देऊन गर्दीचा फायदा घेत गल्लीबोळातून पळून जाऊन फरार झाला.

पोलिसांनी पंचासमक्ष सदर वाहन ताब्यात घेऊन झडती घेतली असता महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेले विविध प्रकारचे गुटखा, पानमसाला व सुगंधित तंबाखू मोठ्या प्रमाणात मिळून आले. त्यामध्ये 4,09,496/-रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ त्याची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेली टोयोटा ईटॉस कार (MH-24-AF-4600) 7,00,000/- रुपयांची असा एकूण 11,09,496/-रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आवश्यक नमुने रासायनिक विश्लेषणासाठी स्वतंत्ररित्या सील करण्यात आले आहेत.

महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा तंबाखू जन्यपदार्थाची चोरटी वाहतूक विक्री करणारा आरोपी माधव तुकाराम मोरे, वय अंदाजे 32 वर्षे, रा. जांब बु., ता. मुखेड, जि. नांदेड. हा अंधाराचा फायदा घेऊन फरार झाला असून याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 123, 223, 274, 275 तसेच सहकलम 59 अन्नसुरक्षा व मानदे अन्वये पोलीस ठाणे उदगीर शहर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथके नियुक्त करण्यात आली आहेत. स्थानिक गुन्हे शाखा, लातूर ही संघटित गुन्हेगारी, अवैध धंदे व समाजविघातक कृत्यांविरोधात सातत्याने कठोर कारवाई करत असून, भविष्यातही अशा कारवाया अधिक तीव्र करण्यात येणार आहेत.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात पथकामधील पोलीस अंमलदार साहेबराव हाके, रियाज सौदागर, मनोज खोसे, आनंद हल्लाळे यांनी केली असून लातूर पोलिसांची ही कारवाई स्पष्ट संदेश देते की, कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. अवैध धंदे करणाऱ्या विरोधात कठोरात कठोर कारवाई केली जाणार आहे.

--------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande