
अमरावती, 09 जानेवारी (हिं.स.)।
धारणी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील टिटंगा गावात मोती माता यात्रा सुरू आहे. या यात्रेत कर्तव्यावर असणाऱ्या एका पोलिसाने गोंधळ घालणाऱ्या एका २५ वर्षीय तरुणाला पकडले. सदर पोलिस त्याला पोलिस चौकीकडे घेऊन जात असतानाच अचानक २० ते २५ जण हातात काठ्या घेऊन आलेत त्यांनी पोलिसाला मारहाण सुरू केली. ही व घटना सात जानेवारीला दुपारी टिटंबा यात्रेत घडली. या प्रकरणी धारणी पोलिसांनी गुन्हे दाखल करून पोलिसाला मारहाण करणाऱ्या अकरा जणांना बुधवारी उशिरा रात्री अटक केली.
या प्रकरणात पोलिस अंमलदार विकास दुर्योधन वाकोडे (२५) यांनी तक्रार दिली आहे. विकास वाकोडे हे धारणी पोलिस ठाण्यात कार्यरत आहे. सात जानेवारीला त्यांची ठाण्याच्या हद्दीतील टीटंबा येथील मोती माता यात्रेत ड्युटी होती. ते टिटंबा यात्रेत कर्तव्य बजावत असताना शिवा सुभाष काकडेकर नामक तरुण गोंधळ व वाद घालत होता. त्यामुळे विकास वाकोडे यांनी त्याला पकडले आणि पोलिस चौकीच्या दिशेने घेऊन जात होते. त्याचवेळी अचानक वीस ते पंचवीस जण हातात काठी व पुराणी घेऊन शिवीगाळ करत आले. त्यांनी विकास वाकोडे यांना थांबवले, त्यानंतर शिवा काकडेकर व अन्य २० ते २५ जणांनी वाकोडे यांना लाथाबुक्क्या, हातातील काठी व पुराणीने मारहाण सुरू केली. ही माहिती होताच यात्रेत कर्तव्यावर असलेल्या इतर पोलिसांनी तात्काळ धाव घेतली व जमावाच्या ताब्यातून विकास वाकोडे यांची सुटका केली. याप्रकरणी विकास वाकोडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, शिवीगळ करणे व अन्य कलमान्वये २० ते २५ जणांविरुध्द गुन्हा दाखल करून अकरा जणांना बुधवारी उशिरा रात्री धारणी पोलिसांनी अटक केली आहे.
यांना केली पोलिसांनी अटकशिवा सुभाष काकडेकर (२५, रा. मांडवा), ईश्वर बाबूलाल कासदेकर (२५), प्रमोद नंदलाल कास्देकर (२७, दोघेही रा. घुलघाट), रमेश रामदेव सावलकर (२५, रा. ढाकणा), मुन्ना कुमानसिंग कच्छवार (२६, रा. मांडवा), विशाल पन्नालाल दहीकर (२३, रा. बिबामल), शंकर शांतु कास्देकर (१९, रा. बेरदाभुरू), रविन्द्र छगन भिलावेकर (२१, रा. बारु), सुनिल बबन भिलावेकर (२१, रा. मांडवा), आशिष शोभाराम धांडे (२६, रा. धुलघाट) आणि अभिषेक राम कास्देकर (१८, रा. काल्पी) यांना पोलिसांनी अटक केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी