‘संगीतसूर्य केशवराव भोसले स्मृती पुरस्कार’ मोहन जोशी यांना जाहीर
कोल्हापूर, 01 ऑक्टोबर, (हिं.स.)। अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, कोल्हापूर शाखेच्या वतीने प्रतिवर्षी दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘संगीतसूर्य केशवराव भोसले स्मृती पुरस्कार’ यंदा मराठी रंगभूमी, चित्रपट आणि दूरचित्रवाणी क्षेत्रात आपल्या अभिनयाचा ठसा उमटविण
ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी


कोल्हापूर, 01 ऑक्टोबर, (हिं.स.)। अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, कोल्हापूर शाखेच्या वतीने प्रतिवर्षी दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘संगीतसूर्य केशवराव भोसले स्मृती पुरस्कार’ यंदा मराठी रंगभूमी, चित्रपट आणि दूरचित्रवाणी क्षेत्रात आपल्या अभिनयाचा ठसा उमटविणारे ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना प्रदान करण्यात येणार आहे. हा पुरस्कार सोहळा रविवार, दिनांक ४ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी ३.३० वाजता गोविंदराव टेंबे रंगमंदिर, गायन समाज देवल क्लब, कोल्हापूर येथे संपन्न होणार आहे, अशी माहिती प्रमुख कार्यवाह गिरीष महाजन यांनी दिली.

मराठी नाट्य आणि चित्रपटसृष्टीमध्ये अनेक दशके आपल्या कसदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे मोहन जोशी हे मराठी मनोरंजनविश्वातील एक महत्त्वाचे नाव आहे. रंगभूमीपासून चित्रपटांपर्यंत विविध भूमिकांमधून त्यांनी आपल्या अभिनयाची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या प्रदीर्घ आणि उल्लेखनीय कलाप्रवासाचा गौरव म्हणून त्यांना यंदाचा ‘संगीतसूर्य केशवराव भोसले स्मृती पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात येणार आहे.

या पुरस्काराचे स्वरूप रोख रुपये ५१,०००, सन्मानचिन्ह, शाल आणि श्रीफळ असे आहे. यापूर्वी हा मानाचा पुरस्कार ज्येष्ठ रंगकर्मी श्री. शरद भुताडिया तसेच ज्येष्ठ अभिनेते श्री. अशोक सराफ यांना प्रदान करण्यात आला आहे. त्यामुळे यंदा हा पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना प्रदान करण्यात येणार असल्याने नाट्यरसिकांमध्ये विशेष उत्सुकता आहे.

या पुरस्कार सोहळ्याचे आणखी एक प्रमुख आकर्षण म्हणजे ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी आणि त्यांच्या पत्नी सौ. ज्योती मोहन जोशी यांची प्रकट मुलाखत. सुप्रसिद्ध निवेदक आणि मुलाखतकार श्री. राजेश दामले ही मुलाखत घेणार आहेत. या मुलाखतीच्या माध्यमातून मोहन जोशी यांच्या कलाप्रवासातील विविध टप्पे, रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील अनुभव, संस्मरणीय भूमिका, त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील आठवणी तसेच त्यांच्या यशस्वी वाटचालीत सौ. ज्योती जोशी यांची लाभलेली साथ अशा विविध पैलूंवर मनमोकळा संवाद रंगणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande