
अकोला, 10 ऑक्टोबर (हिं.स.)।
बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर बोरगाव मंजूजवळ अकोल्याकडून अमरावतीच्या दिशेने जाणाऱ्या धावत्या खाद्यतेल वाहतूक करणाऱ्या मालवाहू ट्रकला शनिवारी (दि. १० ऑक्टोबर) सायंकाळच्या सुमारास अचानक आग लागली. काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केल्याने ट्रक व त्यातील साहित्य जळून खाक झाले. दरम्यान, चालकाच्या लक्षात हा प्रकार येताच त्याने प्रसंगावधान राखून चालक व वाहक या दोघांनाही ट्रकमधून सुरक्षित बाहेर काढले.
मिळालेल्या माहितीनुसार, खाद्यतेलाची वाहतूक करणारा मालवाहू ट्रक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरून अकोल्याकडून अमरावतीच्या दिशेने जात असताना अचानक ट्रकने पेट घेतला. क्षणातच आगीने भीषण स्वरूप धारण केले. ट्रकमधील खाद्यतेलामुळे आग विझविण्याचे काम आव्हानात्मक ठरले. या घटनेमुळे महामार्गावर एकच खळबळ उडाली. बोरगाव मंजू पोलिसांना घटनेची माहिती मिळताच हेडकॉन्स्टेबल महादेव पातोंड, नारायण शिंदे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
दरम्यान, बचाव व मदतकार्यासाठी वीर भगतसिंग आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे सदस्य शुभम कातखेडे आणि धनंजय देशमुख घटनास्थळी दाखल झाले. महामार्गावर ट्रकला लागलेल्या भीषण आगीमुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यामुळे वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागला.
आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट
मालवाहू ट्रकला आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेत झालेल्या नुकसानीचा तपशीलही समोर आलेला नाही. पुढील तपास ठाणेदार सुनील वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली बोरगाव मंजू पोलीस करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे