मुंबई-अमरावती विमानासेवा रविवारी अचानक रद्द, प्रवाशांना प्रचंड मनस्ताप
अमरावती, 10 ऑक्टोबर (हिं.स.)। अलायन्स एअर कंपनीची उद्याची मुंबई-अमरावती-मुंबई विमानासेवा दिवस रद्द झाल्याने प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला आहे. परिचालन कारणांमुळे (ऑपरेशनल रिझन्स) ११ ऑक्टोबर रोजीची मुंबई-अमरावती-मुंबई विमान उड्डाणे रद्
उद्याची  मुंबई-अमरावती-मुंबई विमानासेवा रद्द


अमरावती, 10 ऑक्टोबर (हिं.स.)।

अलायन्स एअर कंपनीची उद्याची मुंबई-अमरावती-मुंबई विमानासेवा दिवस रद्द झाल्याने प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला आहे. परिचालन कारणांमुळे (ऑपरेशनल रिझन्स) ११ ऑक्टोबर रोजीची मुंबई-अमरावती-मुंबई विमान उड्डाणे रद्द करण्यात आली, अशी माहिती महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे (MADC) उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांनी समाज माध्यमांद्वारे दिली. ४ ऑक्टोबरपासून विमानसेवा आठवड्यातून पाच दिवस सुरू करण्याची अलायन्स एअरची घोषणा देखील हवेत विरली आहे.

मुंबईहून अमरावतीला येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रवाशांनी ११ ऑक्टोबरचे अलायन्स एअर विमानसेवेचे तिकीट काढले होते. पण, त्यांना ही विमान उड्डाणे रद्द करण्यात आल्याचा संदेश प्राप्त झाला. यापुर्वीही अनेकवेळा विमानसेवा रद्द करण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांना ऐनवेळी पर्यायी व्यवस्था करणे भाग पडले. रेल्वेचे तिकीट ऐनवेळी मिळणे शक्य नसल्याने खासगी वाहनातून प्रवास करण्याखेरीज त्यांना पर्याय उरलेला नाही.

घोषणा हवेत विरली

अलायन्स एअरने ४ ऑक्टोबरपासून विमानसेवा आठवड्यातून पाच दिवस सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. ऑनलाईन बुकिंग देखील सुरू करण्यात आले होते. पण, आता आठवड्यातून चारच दिवस म्हणजे रविवार, सोमवार, बुधवार आणि शुक्रवार ही विमानसेवा उपलब्ध राहणार आहे. गेल्या वर्षी १ ते १५ डिसेंबर दरम्यान ही विमानसेवा दाट धुक्याच्या समस्येमुळे बंद ठेवण्यात आली होती. त्यानंतर ती पूर्ववत सुरू करण्यात आली, तरी आठवड्यातून दोन दिवसच उड्डाणे झाली आणि वेळेतही बदल करण्यात आला होता. २ जानेवारीपासून आठवड्यातून चार दिवस विमानोड्डाण सुरू झाले. अनेकवेळा विमान उड्डाणे रद्द होत असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत.

-----------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande