
रायगड, १० ऑक्टोबर (हिं.स.) : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांच्या निवासस्थानी झालेल्या कथित शाईफेक प्रकरणाचा कर्जत तालुका महिला आघाडीने निषेध केला आहे. या प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, तसेच नरेंद्र गायकवाड यांना पोलीस संरक्षण द्यावे, अशी मागणी महिला आघाडीच्या वतीने नेरळ पोलीस ठाण्यात निवेदन देऊन करण्यात आली.
पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या आरोपानुसार, प्रियांका गाडे नामक महिलेने नरेंद्र गायकवाड यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्यावर शाईफेक केली. या घटनेची सत्य परिस्थिती समोर आणण्यासाठी पोलिसांनी निष्पक्ष तपास करावा, अशी मागणी महिला आघाडीने केली आहे. तसेच भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, असेही निवेदनात नमूद करण्यात आले.
या वेळी आरपीआयचे कोकण संघटक मारुती गायकवाड, कर्जत तालुका महिला अध्यक्षा सुरेखा कांबळे, माथेरान महिला शहराध्यक्षा मनीषा शिंदे, दीपक गायकवाड, भालचंद्र गायकवाड, शैला कांबळे, अनिता कांबळे आणि सामाजिक कार्यकर्त्या निशा शिवणकर यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
महिला आघाडीने या प्रकरणात पोलिसांनी गांभीर्याने लक्ष घालून योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
------------------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)