
सोलापूर, 10 ऑक्टोबर (हिं.स.)। जिल्ह्यातील उजनी धरणासह मध्यम प्रकल्प, लघुपाटबंधारे प्रकल्प आणि अन्य जलस्रोतांमधील उपलब्ध पाणीसाठ्याचा आढावा घेत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आगामी पाणी नियोजनाबाबत बैठक घेतली. शासनाच्या निर्देशानुसार, येत्या 31 ऑगस्ट 2027 पर्यंत पिण्याच्या पाण्यासाठी आवश्यक साठा सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले.
जिल्ह्यात भूजल पातळीत दिवसेंदिवस घट होत असून नद्या आणि नाले कोरडे पडत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील विविध धरणे व जलाशयांमधील उपलब्ध पाणीसाठ्याचा धरणनिहाय आणि वापरनिहाय आढावा बैठकीत घेण्यात आला. उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करून आगामी काळातील पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी नियोजनावर भर देण्यात आला.
31 ऑगस्ट 2027 पर्यंत पिण्याच्या पाण्याची उपलब्धता सुरक्षित ठेवण्यासाठी पाणीवापराचा प्राधान्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. यामध्ये सर्वप्रथम नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यानंतर पशुधनासाठी पिण्याचे पाणी, पशुधनासाठी चारा आणि उपलब्धतेनुसार अन्य पाणीवापराचे नियोजन करण्यात येणार आहे.उपलब्ध जलसाठ्याचे योग्य व्यवस्थापन करून नागरिक आणि पशुधनाच्या पाण्याची गरज भागविण्यासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करण्यावर बैठकीत भर देण्यात आला.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड