‘मॅगझिन’च्या संगीतासाठी सलील कुलकर्णी आणि संदीप खरे पुन्हा एकत्र
मुंबई, 11 ऑक्टोबर (हिं.स.)। आपल्या आजूबाजूच्या जगापलीकडे जाऊन आपल्या व्यक्तिरेखांकडे पाहणारे चित्रपट मोजकेच असतात. त्याहूनही कमी चित्रपट असे आहेत, जे आजच्या Gen Z पिढीची अस्वस्थता, कुतूहल, स्वतःची ओळख शोधण्याचा प्रवास आणि घराशी असलेलं गुंतागुंतीचं
Magzine


मुंबई, 11 ऑक्टोबर (हिं.स.)। आपल्या आजूबाजूच्या जगापलीकडे जाऊन आपल्या व्यक्तिरेखांकडे पाहणारे चित्रपट मोजकेच असतात. त्याहूनही कमी चित्रपट असे आहेत, जे आजच्या Gen Z पिढीची अस्वस्थता, कुतूहल, स्वतःची ओळख शोधण्याचा प्रवास आणि घराशी असलेलं गुंतागुंतीचं नातं पडद्यावर मांडण्याचा प्रयत्न करतात. मोठ्या पडद्यावरचा भव्य सिनेमॅटिक अनुभव डोळ्यांसमोर ठेवून साकारलेला ‘मॅगझिन’ प्रेक्षकांना कथा, दृश्य आणि ध्वनी यांचा एकत्रित अनुभव देण्यासाठी सज्ज आहे.

शुभम संजय शेवडे लिखित-दिग्दर्शित ‘मॅगझिन’ चित्रपटाची कथा शहरात वाढलेल्या, सिनेमावर प्रेम करणाऱ्या एका तरुणाभोवती फिरते. तो महाराष्ट्रातील आपल्या मूळ गावी जातो आणि तिथे आलेले काही अनपेक्षित अनुभव हळूहळू त्याचा स्वतःकडे, आजूबाजूच्या जगाकडे आणि ‘घर’ या संकल्पनेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतात.

हा चित्रपट २३ ऑक्टोबर २०२६ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. पडद्यामागची ‘मॅगझिन’ची गोष्टही चित्रपटाइतकीच वेगळी आहे. कोणत्याही मोठ्या स्टुडिओच्या पाठबळाशिवाय या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. शुभम शेवडे यांनी त्यांच्या पत्नी अपर्णा कुलकर्णी यांच्यासोबत मिळून या चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटाचा मोठा भाग महाराष्ट्रातील दत्तवाड येथे शूट करण्यात आला. हे अपर्णा कुलकर्णी यांचं मूळ गाव असून, दिग्दर्शकाने छोट्या टीमसोबत तिथे अनेक महिने राहून आणि काम करून चित्रपट पूर्ण केला आहे.

शुभम शेवडे यांच्यासाठी हे गाव केवळ शूटिंगचं ठिकाण नव्हतं, तर ‘मॅगझीन’ची गोष्ट ज्या जगात आकाराला आली तेच हे गाव होतं. तिथे बराच काळ राहिल्यामुळे चित्रपटाच्या टीमला तिथला निसर्ग, माणसं आणि रोजचं जीवन जवळून अनुभवता आलं. त्यामुळे हे जग केवळ कॅमेऱ्यासमोर उभं करण्याऐवजी ते प्रत्यक्ष जगता आलं.

चित्रपटाच्या क्रिएटिव्ह टीममध्ये शुभम शेवडे आणि प्रतीक हंडोरे यांनी पटकथा आणि संवाद लिहिले आहेत. दत्ताराज कुवळेकर यांनी सिनेमॅटोग्राफीची जबाबदारी सांभाळली आहे. विलक्षण कंडवाल यांनी पार्श्वसंगीत दिलं असून, निखिल लांजेकर आणि हिमांशू आंबेकर यांनी साउंड डिझाइन केलं आहे.

‘मॅगझिन’च्या संगीताची बाजूही या चित्रपटाचं एक खास आकर्षण ठरणार आहे. अनेक वर्षांनंतर संगीतकार सलील कुलकर्णी आणि गीतकार संदीप खरे या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकत्र आले आहेत. “चल जाऊ पुन्हा परतून घरला रे” सलील कुलकर्णींच्या संगीताची, संदीप खरे यांच्या शब्दांची आणि शुभंकर कुलकर्णी यांच्या आवाजाची ही सुरेल सांगड ‘मॅगझिन’च्या ‘घराकडे परतण्याच्या’ भावनेला अधिक खोल करते.

चित्रपटाचं ओरिजिनल बॅकग्राउंड स्कोअर उत्तराखंडचे संगीतकार विलक्षण कंडवाल यांनी तयार केलं आहे. या संगीतविश्वाची आणखी एक खासियत म्हणजे ‘मॅगझिन’चा ओरिजिनल साउंडट्रॅक स्वतंत्रपणे प्रेक्षकांसमोर आणला जाणार आहे.

स्वतंत्रपणे तयार झालेला चित्रपट असूनही ‘मॅगझिन’ची स्वप्नं त्याच्या छोट्या निर्मितीच्या चौकटीपेक्षा खूप मोठी आहेत. राघव वर्तक, डॉ. निलेश माने, सुदर्शन देशमुख आणि वेदिका कुलकर्णी या नव्या कलाकारांना या चित्रपटातून संधी मिळाली आहे.

त्यांच्यासोबत अतुल परचुरे, शिवाजी साटम आणि किशोर कदम हे मराठी चित्रपटसृष्टीतील तीन अनुभवी कलाकारही आहेत. नव्या आणि अनुभवी कलाकारांचा हा मेळ चित्रपटाला वेगळी बहुपिढीची छटा देतो. मराठी सिनेमाच्या वारशाचा आदर राखत त्याला नव्या पद्धतीने पाहण्याचा प्रयत्न यातून दिसतो.

पिढ्यांचा हा मेळ चित्रपटाच्या मध्यवर्ती प्रश्नाशीही जोडलेला आहे. बाहेरच्या जगाकडे पाहत मोठी झालेली एक पिढी जेव्हा पुन्हा आपल्या मुळांकडे पाहते, तेव्हा नेमकं काय घडतं? शुभम शेवडे यांचा स्वतःचा प्रवासही या प्रश्नाला एक वेगळी बाजू देतो. अमेरिकेत फिल्ममेकिंगचं शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी लॉस एंजेलिसमध्ये फिल्म आणि जाहिरात क्षेत्रात काम केलं आणि आता ते ह्या मराठी चित्रपटातून दिग्दर्शक म्हणून पदार्पण करत आहेत. अमेरिकेतील त्यांचा हा प्रवास २०२६ मधील एका अनपेक्षित इंडी सिनेमाच्या यशोगाथेशीही जोडला जातो.

‘ऑब्सेशन’ मधून आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळण्यापूर्वी अभिनेत्री इंडी नवारेटे यांनी शुभम शेवडे यांच्या ‘क्रॉस वर्ड्स टुगेदर’ या २०१८ मध्ये बनलेल्या शॉर्ट फिल्ममध्ये काम केलं होतं. लॉस एंजेलिसमध्ये फिल्ममेकिंगचं शिक्षण घेत असताना शेवडे यांनी हा शॉर्ट फिल्म बनवला होता. त्यानंतर नवारेटे यांची अभिनेत्री म्हणून झपाट्याने ओळख निर्माण झाली. स्वतंत्रपणे तयार झालेल्या या हॉरर चित्रपटाने कथित ७५०,००० डॉलरच्या निर्मिती बजेटच्या तुलनेत जगभरात ५० कोटी डॉलरपेक्षा जास्त कमाई केली आहे.

‘ऑब्सेशन’ आणि ‘मॅगझिन’ या दोन्हींचा स्वतंत्रपणे घडलेला प्रवास पाहता, त्यांच्यातील हे साम्य नक्कीच लक्ष वेधून घेतं. दोन्ही प्रोजेक्ट्स पारंपरिक स्टुडिओ पद्धतीपासून दूर राहून तयार झाले आणि थिएटरपर्यंत पोहोचण्यासाठी आपापला वेगळा मार्ग त्यांनी शोधला. ‘मॅगझिन’ला अशाच प्रकारचं व्यावसायिक यश मिळेल का, हे मात्र येणारा काळच सांगेल.

या योगायोगामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाला एक रंजक संदर्भ मिळतो. मात्र, ‘मॅगझिन’ला मिळणारी दखल त्यापलीकडेही जाताना दिसते. २०२६ साठी फिप्रेस्सी-इंडियाने निवडलेल्या समकालीन भारतीय चित्रपटांच्या यादीत ‘मॅगझीन’चा समावेश करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे, याच निवडीत संतोष दवाखर यांच्या मराठी ‘गोंधळ’ चित्रपटाचाही समावेश होता. पुढे ‘गोंधळ’ची ९९व्या अकॅडमी अवॉर्ड्ससाठी भारताची अधिकृत निवड झाली.

‘मॅगझिन’साठी आता हीच दखल मोठ्या थिएटर प्रेक्षकांपर्यंत पोहोचावी, ही अपेक्षा आहे. मोठ्या स्टुडिओच्या चौकटीबाहेर तयार झालेल्या या चित्रपटाला तो ज्या प्रेक्षकांसाठी बनवला आहे, त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची संधी मिळावी, हीच टीमची इच्छा आहे.

चित्रपटाचा ट्रेलर आता ऑनलाइन उपलब्ध असून, त्यातून जेन झी नायकाची आणि महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाकडे पाहण्याची त्याची वेगळी नजर प्रेक्षकांना पाहायला मिळते.

व्हीएफएक्स आर्टिस्ट शुभंकर सौंदणकर आणि डीआय कलरिस्ट भूषण सहस्रबुद्धे यांनी चित्रपटाचं दृश्यविश्व घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांनी अनुक्रमे व्हिज्युअल इफेक्ट्स आणि कलर ग्रेडिंगची जबाबदारी सांभाळली आहे.

शुभम मुसाळे आणि अथर्व चव्हाण हे कॅमेरा टीमचा भाग होते, तर अविनाश मोडक यांनी मेकअप आर्टिस्ट म्हणून आणि अक्षय मोरे यांनी लोकेशन साउंडची जबाबदारी सांभाळली आहे.

शुभम शेवडे आणि अपर्णा कुलकर्णी यांच्यासोबत अमृत कुलकर्णी यांनीही या चित्रपटाची सहनिर्मिती केली आहे. डॉ. मोहन आगाशे आणि भालचंद्र कुलकर्णी यांनी कार्यकारी निर्माते म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. याशिवाय व्हिज्युअल प्रमोशन डिझायनर विशाल बाटे, लाइन प्रोड्युसर राम कळगी, मीडिया कन्सल्टंट अमेय आंबेरकर आणि वितरक सनशाइन स्टुडिओ यांचाही टीममध्ये समावेश आहे.

छोटी टीम, एक गाव आणि स्वतंत्रपणे उभी केलेली एक कल्पना इथून सुरू झालेला ‘मॅगझीन’चा प्रवास आतापर्यंत बराच पुढे आला आहे. ‘मॅगझीन’ २३ ऑक्टोबर २०२६ रोजी केवळ सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande