
मुंबई, 12 ऑक्टोबर (हिं.स.) : बचतदारांसाठी वैशिष्टपूर्ण प्रिमीयम सुविधा प्रदान करणारा 'व्हर्टो' (VERTO) हा नवीन बचत खाते प्रकार आजपासून फेडरल बँकेने सुरू केला आहे. नव्या युगाला साजेसे असलेले हे बचत खाते भारतातील महत्त्वाकांक्षी पिढीसाठी तयार करण्यात आलले आहे. या नव्या पिढीतील तरुण व्यावसायिक, उद्योजक, नोकरदार अधिकारी आणि विकासावर लक्ष केंद्रित करणाऱ्या व्यक्तींसाठी ही खास सुविधा आहे.
व्हर्टो सुविधेमुळे डेबिट कार्डद्वारे खाद्यपदार्थ, फॅशन आणि विमान प्रवासासाठी होणाऱ्या खर्चावर ५ टक्के कॅशबॅक, ३५ लाखांपर्यंतचे मोफत विमा संरक्षण, देशांतर्गत विमानतळ लाउंज प्रवेश, लॉकर भाड्यात सवलत, परदेशात पैसे पाठवण्याचे फायदे मिळतात. तसेच जोडीदार व मुलांसाठी विशेष बँकिंग सुविधा प्रदान केली जाते.
या नवीन खात्यांतर्गत आर्थिक मार्गदर्शक देखील दिले जाते. त्यामध्ये प्रामुख्याने खर्च विश्लेषण, कॅशबॅक समरी, बाजारातील घडामोडी आणि संपत्ती निर्मितीचे दृष्टिकोन यांचा समावेश आहे. ग्राहकांना माहितीपूर्ण आर्थिक निर्णय घेण्यास आणि त्यांना आर्थिक उद्दिष्टांच्या मार्गावर कायम राहण्यास या खात्यामुळे मदत होणार आहे.
व्हर्टो सुविधेची घोषणा करताना फेडरल बँकेचे कन्झ्युमर बँकिंग विभागाचे राष्ट्रीय प्रमुख श्री. विराट सुनील दीवानजी म्हणाले की, “आजचे ग्राहक आपले पैसे ठेवण्यासाठी केवळ खाते शोधत नाहीत, तर त्यांना आणखी सुविधा हव्या आहेत. आपण कशा पध्दतीने जीवन जगतो, कशासाठी प्रयत्न करत आहेत आणि काळानुरूप आर्थिक गरजा कशा बदलत आहे, हे आपल्या बँकेने समजून घ्यावे, अशी खातेदारांची बँकेकडून अपेक्षा आहे. दररोजचे मूल्य, सुसंगत फायदे आणि आमच्यासोबतच्या त्यांच्या आर्थिक संबंधांना स्पष्ट दृष्टिकोन कसा देता येईल, याच विचारातून 'व्हर्टो' खाते तयार करण्यात आलेले आहे.
ग्राहकांसोबत अधिकाधिक संबंध वाढणे आणि त्यांच्या आर्थिक प्रवासाचा अधिक अर्थपूर्ण भाग बनणे हेच आमचे उद्दिष्ट आहे.”
व्हर्टो खाते सुविधांसाठी पात्रतेचे अनेक निकष आहेत. रहिवासी व्यक्तींना शिल्लक-आधारित, पगार-आधारित आणि नातेसंबंध-आधारित निकषांचाही वापर करत खाते उघडता येईल. त्यामुळे प्रीमियम बँकिंगचा अनुभव घेऊ इच्छिणाऱ्या खातेदारांना अधिक लवचिकता मिळते.
फेडरल बँक या वैशिष्ट्यपूर्ण बचत बँक ऑफरच्या माध्यमातून कॅशबॅक, सुरक्षा, जीवनशैलीचे विशेषाधिकार आणि कौटुंबिक फायदे यांना एकत्र आणते. ग्राहकांच्या आर्थिक गरजा आणि महत्त्वाकांक्षा जसजशा बदलतात, तसतसे त्यांना आधार देण्यासाठी ही एक सर्वसमावेशक बचत खाते सुविधा तयार करण्यात आलेली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी