
नवी दिल्ली, 13 ऑक्टोबर (हिं.स.)हॉकी इंडियाने 'आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी पंजाब २०२६' साठी भारतीय पुरुष संघाची घोषणा केली आहे. ही स्पर्धा २७ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या कालावधीत जालंधर आणि मोहाली येथे होणार आहे. जपानमधील आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला ऐतिहासिक सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या आणि पहिल्यांदाच आपले आशियाई विजेतेपद यशस्वीपणे राखणाऱ्या संघाचे नेतृत्व कर्णधार हरमनप्रीत सिंग करणार आहे.
आशियाई क्रीडा स्पर्धेत यश मिळवून देणारा संघ कायम ठेवण्यात आला आहे. मायदेशात आशियातील आघाडीच्या हॉकी संघांशी सामना करण्याची तयारी करत असताना संघात सातत्य राखण्यावर भर देण्यात आला आहे. गोलकीपर कृष्ण बहादूर ठाकूर याचे संघात पुनरागमन झाले आहे, तर युवा डिफेंडर अमनदीप लाक्रा आणि मिडफिल्डर आदित्य अर्जुन लालागे यांना वरिष्ठ संघात आपले स्थान बळकट करण्याची आणखी एक संधी मिळाली आहे. १८ सदस्यांच्या मुख्य संघाव्यतिरिक्त, मिडफिल्डर विष्णू कांत सिंग आणि फॉरवर्ड अंगद बीर सिंग यांची राखीव खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे.
पंजाबमध्ये आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी खेळणे ही एक विशेष बाब असेल, असे मुख्य प्रशिक्षक क्रेग फुल्टन म्हणाले. या संघात युवा आणि अनुभवी खेळाडूंचा सुरेख संगम आहे आणि मायदेशातील प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या ऊर्जेचा लाभ घेण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. भारतात स्पर्धा खेळण्यासारखा दुसरा आनंद नाही आणि आम्ही याची उणीव भासत होतो, असेही त्यांनी नमूद केले.
ही स्पर्धा विशेष महत्त्वाची आहे कारण यामुळे पंजाबमध्ये आंतरराष्ट्रीय हॉकीचे पुनरागमन होत आहे. पंजाबने या खेळासाठी मोठे योगदान दिले असून अनेक पिढ्यांचे दिग्गज खेळाडू या राज्याने देशाला दिले आहेत. जालंधर आणि मोहाली येथे होणाऱ्या सामन्यांमुळे, या खेळाशी खोलवर नाते असलेल्या प्रदेशात आशियातील सर्वोत्तम हॉकीपटूंचा सहभाग पाहायला मिळेल.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे