नवरात्रीचे नऊ दिवसच नाही, तर प्रत्येक दिवस स्त्रियांचा आहे – जुई गोगरी
मुंबई, 13 ऑक्टोबर (हिं.स.)। नवरात्र म्हणजे भक्ती, उत्साह आणि चैतन्याने भरलेले नऊ दिवस! देवीच्या विविध रूपांची आराधना करताना तिच्यातील सामर्थ्य, धैर्य आणि आत्मविश्वासाचा उत्सव साजरा केला जातो. मात्र, स्त्रीशक्तीचा अनुभव केवळ देवीच्या पूजेपुरता मर्य
“नवरात्रीचे नऊ दिवसच नाही, तर प्रत्येक दिवस स्त्रियांचा आहे!” – जुई गोगरी*


मुंबई, 13 ऑक्टोबर (हिं.स.)। नवरात्र म्हणजे भक्ती, उत्साह आणि चैतन्याने भरलेले नऊ दिवस! देवीच्या विविध रूपांची आराधना करताना तिच्यातील सामर्थ्य, धैर्य आणि आत्मविश्वासाचा उत्सव साजरा केला जातो. मात्र, स्त्रीशक्तीचा अनुभव केवळ देवीच्या पूजेपुरता मर्यादित नसतो. आपल्या आयुष्यातील आव्हानांना धैर्याने सामोरं जाणं, स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवणं आणि कितीही अडचणी आल्या तरी आपल्या स्वप्नांच्या दिशेने वाटचाल करत राहणं, यातूनही स्त्रीशक्ती दिसून येते. याच विचारांमधून *‘सनई चौघडे’* मालिकेत परब कुटुंबातील साध्या, प्रेमळ आणि लाडक्या मुलीची, *असावरी* ची भूमिका साकारणारी *जुई गोगरी* ने आपले विचार मांडले आहेत.

जुई सांगते, “माझ्यासाठी स्त्रीशक्ती म्हणजे आयुष्यातील अडचणींना केवळ सामोरं जाणं नाही, तर स्वतःवर विश्वास ठेवून त्यांना सामोरं जाणं. जेव्हा आपला स्वतःवर विश्वास असतो, तेव्हा खूप गोष्टी सोप्या होतात. एक स्त्री एकाच वेळी अनेक भूमिका निभावत असते. मग ती आईची असो, बहिणीची असो, पत्नीची असो किंवा आणखी कोणतीही. एक स्त्री या सगळ्या भूमिका खूप चोखपणे निभावते. आईपण जपून स्वतःचं करिअरसुद्धा सांभाळते. वैयक्तिक आयुष्य सांभाळून करिअरमध्येही पुढे जाणं, हीसुद्धा खरी स्त्रीशक्ती आहे.

स्त्रियांनी स्वतःवर कायम भरपूर विश्वास ठेवायला हवा. जितका स्वतःवर विश्वास असेल, तितकी स्त्री आयुष्यात पुढे जाऊ शकते. स्त्रीने स्वतःला कधीच कमी समजू नये. एका स्त्रीमध्ये जितकी शक्ती असते, तितकी इतर कोणातच नसते, असं मला वाटतं. स्त्रीची स्वप्नं कितीही मोठी असली किंवा कितीही संकटं आली, तरी ती पूर्ण करण्यासाठी तिने मेहनत घेत राहिली पाहिजे आणि स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे.

स्वतःमधील स्त्रीशक्ती कधी जाणवली, याविषयी सांगताना जुईने तिच्या आयुष्यातील एका महत्त्वाच्या टप्प्याची आठवण सांगितली. ती म्हणते, “मी कॉलेजमध्ये असताना आम्ही घर घेत होतो. तेव्हा मी आणि माझ्या बहिणीने मिळून जुनं घर विकण्यापासून ते नवीन घर घेण्यापर्यंत सगळं केलं. त्या वेळी मला खरंच जाणवलं की माझ्यातही ही ताकद आहे. माझं वय कमी असलं, तरी मी या सगळ्या गोष्टी करू शकले आणि माझ्यात तेवढी क्षमता आहे, याची मला जाणीव झाली. तेव्हा मी माझ्यातली स्त्रीशक्ती अनुभवली, असं मी म्हणेन.

बाबांना सोडलं, तर आमच्या घरात फक्त मुलीच आहेत. त्यामुळे आमच्या घरात खरं तर खूप मोठ्या प्रमाणात स्त्रीशक्ती आहे. स्त्रीने एखादी गोष्ट करायचं ठरवलं, तर ती नक्कीच करू शकते, हे मी अनुभवलं आहे. कितीही संकटं आली, तरी आपण त्यातून मार्ग काढू शकतो, ही भावना आणि हा विश्वास प्रत्येक स्त्रीमध्ये असायलाच हवा.”

नवरात्रीच्या सणाविषयी बोलताना जुई सांगते, “मी खरं तर जैन आहे. त्यामुळे गुजराती लोकांप्रमाणे आमच्याकडे नवरात्रीचं फार मोठं सेलिब्रेशन होत नाही. पण आमची जी कुलदेवी आहे, तिची आम्ही नऊ दिवस घरी आरती करतो. आता शूटिंगमुळे त्यासाठी फार वेळ मिळत नाही. पण जेव्हा सुट्टी असते, तेव्हा मी गरबा खेळायला नक्की जाते. गरबा खेळताना मला खूप छान वाटतं. कारण गरबा हा केवळ आनंदासाठी खेळला जात नाही, तर देवीच्या आराधनेसाठी खेळला जातो. त्यात एक प्रकारची शुद्धता असते आणि सगळीकडे दैवी वातावरण जाणवतं. अशा प्रकारे मी माझी नवरात्र साजरी करते आणि मला हा सण खूप आवडतो. नवरात्रीच्या निमित्ताने प्रत्येक स्त्रीला संदेश देताना जुई म्हणते, “मी नेहमी हेच सांगेन की नवरात्रीचे हे फक्त नऊ दिवस स्त्रियांचे नसतात, तर प्रत्येक दिवस स्त्रियांचा असतो. त्यामुळे छान जगा, तुम्हाला जे करायचं आहे ते करा आणि ते ठामपणे करा. ‘मला हे करायचंच आहे,’ असा विश्वास स्वतःवर ठेवा आणि त्याप्रमाणे जगा.”

स्वतःच्या क्षमतेची जाणीव ठेवून, आत्मविश्वासाने आणि जिद्दीने पुढे जाणाऱ्या प्रत्येक स्त्रीमध्ये एक वेगळी शक्ती असते. नवरात्रीच्या या मंगलमय पर्वात स्वतःच्या स्वप्नांना महत्त्व देण्याचा, स्वतःवर विश्वास ठेवण्याचा आणि मनापासून जगण्याचा हा संदेश प्रत्येक स्त्रीसाठी प्रेरणादायी ठरतो.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande