नाशिक शहरातील घरफोड्यांमध्ये १० तोळ्यांचे दागिने, ७० किलो तांबे-पितळेच्या भांड्यांची चोरी
नाशिक, 14 ऑक्टोबर (हिं.स.)। : शहर परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या घरफोड्यांमध्ये सुमारे दहा तोळ्यांचे सोन्याचे दागिने, ७० किलो तांबे-पितळाची भांडी, चांदीचे दागिने व रोकड असा लाखो रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याच्या नोंदी पोलीस ठाण्य
नाशिक शहरातील घरफोड्यांमध्ये १० तोळ्यांचे दागिने, ७० किलो तांबे-पितळेच्या भांड्यांची चोरी


नाशिक, 14 ऑक्टोबर (हिं.स.)।

: शहर परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या घरफोड्यांमध्ये सुमारे दहा तोळ्यांचे सोन्याचे दागिने, ७० किलो तांबे-पितळाची भांडी, चांदीचे दागिने व रोकड असा लाखो रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याच्या नोंदी पोलीस ठाण्यांमध्ये करण्यात आल्या आहेत.

घरफोडीचा पहिला प्रकार हुंडीवाला लेन येथे घडला. याबाबत मंदार श्रीकृष्ण देव (रा. तुळजा आर्केड, हुंडीवाला लेन, जुनेनाशिक) यांनी फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले, की त्यांचे काका बाळकृष्ण रामचंद्र देव हे राहत असलेल्या देव वाड्यातील घराच्या मागील बाजूचा लाकडी दरवाजा कशाच्या तरी सहाय्याने तोडून अज्ञात तीन अनोळखी चोरट्यांनी घरात प्रवेश केला. यावेळी घरात असलेल्या पाच लाख रुपये किमतीच्या ४८ ग्रॅमच्या सोन्याच्या दोन पारंपरिक बांगड्या, १ लाख ५० हजार रुपये किमतीची १५ ग्रॅमची सोन्याची अंगठी, एक लाख रुपये किमतीची ७० किलो वजनाची तांबे-पितळेची भांडी, १८ हजार रुपये किमतीचे चांदीचे १० ते १२ नग लक्ष्मी व गणपतीचे कॉईन, पाच हजार रुपये किमतीचे चांदीचे चार ते पाच ग्लास, असे एकूण ७लाख ७३ हजार रुपये किमतीचे दागिने व साहित्य भरदुपारच्या सुमारास घरफोडी करून चोरून नेले. फिर्यादी यांचे भाडेकरू नरेश शहा यांनी पाहिलेल्या व सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत असलेल्या तीन अनोळखी इसमांनी ही घरफोडी केल्याची बाब लक्षात आली. या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक उगले करीत आहेत.

घरफोडीचा दुसरा प्रकार डीजीपीनगर येथे घडला. फिर्यादी जमिला अख्तर काजी (रा. डीजीपीनगर क्रमांक १, नाशिक-पुणे रोड) हे दि. २८ सप्टेंबर ते १२ ऑक्टोबर या कालावधीत बाहेरगावी असल्याने त्यांचे घर बंद होते. ही संधी साधून अज्ञात चोरट्याने त्यांच्या बंद घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा कशाच्या तरी सहाय्याने कापून घरात प्रवेश केला. घरातील लोखंडी कपाटात ठेवलेली २० हजार रुपयांची रोकड, ३६ हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या अंगठ्या, २० हजार रुपये किमतीच्या पायातील चांदीच्या पट्ट्या असा एकूण ७६ हजार रुपये किमतीचा ऐवज घरफोडी करून चोरून नेला. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बकाल करीत आहेत.

घरफोडीचा तिसरा प्रकार नाशिकरोड येथे घडला. फिर्यादी मुनीर निजाम शेख (रा. भोर मळा, नाशिकरोड) हे दि. १० ऑक्टोबर रोजी सायंकाळच्या सुमारास सहकुटुंब मेहुणीच्या घरी मुक्कामी गेले होते. त्यावेळी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने शेख यांच्या घराच्या मुख्य लाकडी दरवाजाचा कोयंडा कशाच्या तरी सहाय्याने तोडून घरात प्रवेश केला. यावेळी घरात ठेवलेली ३० हजार रुपये किमतीची १० ग्रॅम वजनाची सोन्याची पोत, ४५ हजार रुपये किमतीचे १५ ग्रॅमचे कानातील झुबे, १५ हजार रुपये किमतीची पाच ग्रॅमची सोन्याची लहान पोत, २१ हजार रुपये किमतीचे सात ग्रॅम वजनाचे सोन्याचे गोल टॉप व ४३ हजार ३०० रुपयांची रोकड असा एकूण १ लाख ५४ हजार ३०० रुपये किमतीचा ऐवज घरफोडी करून चोरून नेला. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार टेमगर करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI


 rajesh pande