
मुंबई , 14 ऑक्टोबर (हिं.स.)।दुष्काळामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी दिलासा देण्यासाठी राज्य सरकारनं प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात 5 हजार रुपये जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत दिवाळीपूर्वी देणं शक्य नसलं, तरी तातडीची आर्थिक मदत म्हणून ही रक्कम दिली जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर दिली.विशेष म्हणजे, ही रक्कम दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांच्या बँक खात्यांत जमा केली जाणार आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांना आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी आर्थिक मदत मिळणार आहे.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, दुष्काळ जाहीर करण्याची प्रक्रिया साधारणपणे नोव्हेंबरच्या अखेरीस पूर्ण होते. मात्र, यंदाची परिस्थिती लक्षात घेऊन शेतकऱ्यांना लवकर मदत मिळावी, यासाठी सरकारनं ऑक्टोबरमध्येच दुष्काळासंदर्भातील शासन निर्णय काढला. दिवाळीपूर्वी मदतवाटपाची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करणे कठीण असल्यानं मंत्रिमंडळाच्या चर्चेनंतर शेतकऱ्यांना तातडीने 5 हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी नव्याने सुमारे 3.5 लाख शेतकऱ्यांची यादी तयार करण्यात आली आहे. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होईल, यासाठी आवश्यक नियोजन करण्यात येत असल्याचंही मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केलं.
महाराष्ट्रातील शेतकरी नैसर्गिक आपत्ती आणि पिकांच्या नुकसानीच्या दुहेरी संकटाचा सामना करत असताना सरकारने ही मदत जाहीर केली आहे. त्यामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना दिवाळीच्या काळात मोठा आर्थिक दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. दिवाळीपूर्वीच मदतीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यांत जमा करण्यासाठी प्रशासनाकडून वितरणाची प्रक्रिया पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode