एअर इंडिया इमारत, नवीन प्रशासकीय इमारत, मनोरा आमदार निवासाची कामे दर्जेदार करा – मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले
मुंबई, 15 ऑक्टोबर (हिं.स.) - राज्यातील शासकीय इमारतींच्या बांधकाम व नूतनीकरणाची कामे दर्जेदार, नियोजनबद्ध आणि निर्धारित कालमर्यादेत पूर्ण करण्यासोबतच रस्ते विकासकामांना गती देण्याच्या दृष्टीने सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आ
मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले


मुंबई, 15 ऑक्टोबर (हिं.स.) - राज्यातील शासकीय इमारतींच्या बांधकाम व नूतनीकरणाची कामे दर्जेदार, नियोजनबद्ध आणि निर्धारित कालमर्यादेत पूर्ण करण्यासोबतच रस्ते विकासकामांना गती देण्याच्या दृष्टीने सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज मुंबईतील विविध विकासकामांचा आढावा घेतला. यावेळी एअर इंडिया इमारतीचे नूतनीकरण, मंत्रालय परिसरातील नवीन प्रशासकीय इमारतीचे बांधकाम, मनोरा आमदार निवासाच्या पुनर्बांधणीचे काम तसेच उमरखेड-महागाव विधानसभा मतदारसंघातील रस्ते विकासकामांच्या सद्यस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. कामांचा दर्जा, प्रगती आणि पुढील नियोजनाचा आढावा घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश देण्यात आले.

एअर इंडिया इमारतीच्या नूतनीकरणाचा आढावा

मुंबईतील नरिमन पॉईंट येथील राज्य शासनाच्या ताब्यातील एअर इंडिया इमारतीच्या नूतनीकरणासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने आयोजित बैठकीत स्थापत्य व विद्युत कामांची सद्यस्थिती, प्रशासकीय कार्यवाही आणि पुढील नियोजनाचा आढावा घेण्यात आला.

राज्य शासनाने या इमारतीचा ताबा घेतल्यानंतर इमारतीच्या नूतनीकरणासाठी आवश्यक प्रशासकीय कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. इमारतीतील स्थापत्य व विद्युत कामांसाठी प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली असून, संबंधित कामांचे अंदाजपत्रक तयार करून तांत्रिक मान्यतेसाठी सादर करण्यात आले आहे.

इमारतीच्या वास्तुविशारद आणि विद्युत सल्लागार नियुक्तीसंदर्भातील कार्यवाहीचाही यावेळी आढावा घेण्यात आला. इमारतीवरील जुना एअर इंडियाचा लोगो काढण्याचे काम पूर्ण झाले असून, नवीन लोगोच्या डिझाइनचे काम सर जे. जे. कला संचालनालयामार्फत सुरू आहे. विद्युत कामांसाठी सल्लागार नियुक्त करण्यात आला असून, संबंधित कामांच्या निविदा प्रक्रियेची सद्यस्थितीही जाणून घेण्यात आली.

इमारतीच्या नूतनीकरणाशी संबंधित प्रशासकीय प्रक्रिया नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करून पुढील कामांना गती द्यावी. स्थापत्य व विद्युत कामांच्या गुणवत्तेवर विशेष लक्ष देत आवश्यक समन्वय साधावा आणि कामांच्या प्रत्येक टप्प्याचा नियमित आढावा घ्यावा, अशा सूचना मंत्री श्री. भोसले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

नवीन प्रशासकीय इमारतीचे काम निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश

मंत्रालय परिसरातील गार्डन गेटजवळ उभारण्यात येत असलेल्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाची पाहणी करून मंत्री श्री. भोसले यांनी कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला.

या इमारतीमध्ये विविध शासकीय कार्यालये, मुख्यमंत्री यांच्यासाठी प्रवेश लॉबी, उपाहारगृह, व्हीआयपी कक्ष, स्वागत कक्ष, मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष, विकसित महाराष्ट्र कक्ष तसेच विविध विभागांसाठी कार्यालयीन जागा उपलब्ध होणार आहेत.

इमारतीच्या संरचनात्मक कामांचा महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला असून, बाह्य दर्शनी भागाचे काम पूर्ण झाले आहे. एसीपी क्लॅडिंग, स्पायडर ग्लेझिंग आणि इतर बाह्य सजावटीची कामे प्रगतिपथावर आहेत. फ्लोअरिंगचे काम बहुतांश पूर्ण झाले असून, उर्वरित मजल्यांवरील पार्टीशन, विद्युत व्यवस्था आणि इतर संबंधित कामे सुरू आहेत.

कामाच्या सद्यस्थितीचा आढावा घेताना उर्वरित कामे निर्धारित कालमर्यादेत पूर्ण करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ व यंत्रसामग्रीमध्ये वाढ करावी, कामाचा वेग वाढवावा आणि विविध कामांमध्ये योग्य समन्वय राखावा, असे निर्देश मंत्री श्री. भोसले यांनी संबंधित अधिकारी व कंत्राटदारांना दिले.

शासकीय कार्यालयांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देताना बांधकामाचा दर्जा, सुरक्षितता आणि कामांची गुणवत्ता यांना प्राधान्य द्यावे. कामात अनावश्यक विलंब होणार नाही, याची दक्षता घेऊन नियमितपणे प्रगतीचा आढावा घ्यावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मनोरा आमदार निवासाच्या कामांचा आढावा

मुंबईतील मनोरा आमदार निवासाच्या पुनर्बांधणीच्या कामाची पाहणी करून मंत्री श्री. भोसले यांनी बांधकामाच्या सद्यस्थितीचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी फ्लॅटची गुणवत्ता, फ्लोअरिंग तसेच सुरू असलेल्या विविध कामांची तपासणी करण्यात आली.

मनोरा आमदार निवासाच्या पुनर्बांधणी प्रकल्पामध्ये आधुनिक सुविधांनी युक्त आणि पर्यावरणपूरक इमारती उभारण्याचे नियोजन आहे. या प्रकल्पामध्ये दोन्ही टॉवर आणि इतर इमारत क्षेत्रातील बांधकामाचा समावेश आहे. प्रकल्पाला ग्रीन बिल्डिंग मानांकन मिळवून देण्याच्या दृष्टीनेही आवश्यक तरतुदी करण्यात आल्या आहेत.

सद्यस्थितीत टॉवर एच्या पायाभूत बांधकामाचे काम पूर्ण झाले असून, बहुतांश मजल्यांवरील स्लॅबचे काम पूर्ण झाले आहे. टॉवर बीच्या बांधकामानेही महत्त्वाचा टप्पा गाठला असून, उर्वरित स्लॅबचे काम प्रगतिपथावर आहे. दोन्ही टॉवरमधील अंतर्गत बांधकाम, फ्लोअरिंग, प्लंबिंग, विद्युत व्यवस्था, वातानुकूलन यंत्रणा आणि अग्निसुरक्षेशी संबंधित कामे सुरू आहेत. इतर इमारत क्षेत्रातील बांधकाम व अंतर्गत कामेही प्रगतिपथावर आहेत.

मनोरा आमदार निवासाच्या बांधकामाचा दर्जा उच्च राखून सर्व कामे नियोजनानुसार पूर्ण करावीत. फ्लोअरिंग, अंतर्गत सजावट, विद्युत व्यवस्था आणि इतर आवश्यक सुविधांची कामे निर्धारित मानकांनुसार पूर्ण करून प्रकल्पाच्या प्रगतीला गती द्यावी. तसेच सुरू असलेल्या कामांचा नियमित आढावा घेऊन उर्वरित कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशा सूचना मंत्री श्री. भोसले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande