
ओडेन्स, 16 ऑक्टोबर (हिं.स.)। भारताची १७ वर्षीय बॅडमिंटनपटू तन्वी शर्मा हिने डेन्मार्क ओपन २०२६ च्या महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. गुरुवारी रात्री उशिरा झालेल्या राऊंड ऑफ १६ च्या सामन्यात तिने जर्मनीच्या यव्होन ली हिचा २१-१७, २१-१९ असा पराभव केला. आता उपांत्यपूर्व फेरीत तिचा सामना प्रथमच जागतिक क्रमवारीतील अव्वल खेळाडू आणि दक्षिण कोरियाच्या आन से यंग हिच्याशी होणार आहे.
तन्वीने यव्होन लीविरुद्ध अवघ्या ३९ मिनिटांत विजय मिळवला. दुसऱ्या गेममध्ये कडवी लढत मिळूनही भारतीय खेळाडूने संयम राखला आणि सलग दोन गेम जिंकत सामना आपल्या नावावर केला. तन्वीने पहिल्या गेमच्या सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केला. यव्होन ली पिछाडीवर पडल्यानंतर सातत्याने पुनरागमन करण्याचा प्रयत्न करत होती. मात्र, तन्वीने २१-१७ असा गेम जिंकला.
दुसऱ्या गेममध्ये जर्मनीच्या खेळाडूने अधिक कडवे आव्हान दिले. प्रत्येक गुणासाठी चुरस पाहायला मिळाली आणि अनेक प्रसंगी यव्होनने आघाडीही घेतली. मात्र, १६-१६ अशी बरोबरी झाल्यानंतर तन्वीने सलग चार गुण मिळवत निर्णायक आघाडी घेतली. यव्होनने पुन्हा संघर्ष करत गुणसंख्या १९ पर्यंत नेली. परंतु, तन्वीने सलग दोन गुण मिळवत २१-१९ असा गेम जिंकला आणि सामनाही आपल्या नावे केला.
यापूर्वी महिला दुहेरीत भारताची त्रीसा जॉली आणि गायत्री गोपीचंद ही जोडीही उपांत्यपूर्व फेरीत खेळणार आहे. भारतीय जोडीचा सामना दुसरे मानांकन असलेल्या मलेशियाच्या पर्ली टॅन आणि थिनाह मुरलीधरन या जोडीशी होणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule