शाहिरी, लोककला संवर्धनासाठी प्रा. प्रवीण जाधव यांना ‘उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार’ जाहीर
पारंपरिक जागर कलेच्या माध्यमातून सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान मुंबई, 16 ऑक्टोबर (हिं.स.) : संगीत, नृत्य आणि नाट्य क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत दिला जाणारा ‘उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार २०२५’ प्रा. प्रवीण जाधव
मुंबई


पारंपरिक जागर कलेच्या माध्यमातून सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान

मुंबई, 16 ऑक्टोबर (हिं.स.) : संगीत, नृत्य आणि नाट्य क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत दिला जाणारा ‘उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार २०२५’ प्रा. प्रवीण जाधव यांना जाहीर झाला आहे. नवी दिल्ली येथील संगीत नाटक अकादमीच्या वतीने या पुरस्काराची घोषणा करण्यात आली. पारंपरिक जागर कलेचे जतन आणि संवर्धन करण्यासोबतच सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानासाठी प्रा. जाधव यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. येत्या 19 ऑक्टोबर 2026 रोजी हा पुरस्कार सोहळा दिल्ली येथे संपन्न होणार आहे.

प्रा. प्रवीण जाधव हे महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीतील जागर परंपरेच्या जतन आणि संवर्धनासाठी सातत्याने कार्यरत आहेत. पारंपरिक जागर कलेच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक प्रश्न, लोकजीवन आणि सांस्कृतिक मूल्ये प्रभावीपणे मांडली आहेत. त्यांच्या या कार्यामुळे लोककलेच्या माध्यमातून समाजप्रबोधनाला चालना मिळत आहे.

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीनेही त्यांच्या कार्याची दखल घेण्यात आली आहे. लोकशाहीर परंपरा, पथनाट्य, लोकजागृती आणि सामाजिक प्रबोधन या क्षेत्रांत त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांच्या कलाविष्कारातून सामाजिक प्रश्नांवर भाष्य करताना लोकसंस्कृतीचे जतन करण्यावरही भर दिला जातो.

उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार हा युवा कलाकारांच्या कलात्मक योगदानाचा गौरव करणारा मानाचा पुरस्कार आहे. या पुरस्कारामुळे प्रा. प्रवीण जाधव यांच्या कार्याला राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे. त्यांच्या या यशाबद्दल कला आणि सांस्कृतिक क्षेत्रातून अभिनंदन व्यक्त केले जात आहे. लोककला आणि सामाजिक प्रबोधनाचा वारसा जपणाऱ्या प्रा. प्रवीण जाधव यांच्या कार्याचा हा राष्ट्रीय सन्मान महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रासाठी अभिमानाची बाब ठरला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande