माजी राज्यमंत्री रामचंद्रराव पाटील अंधोरीकर यांचे निधन
लातूर, 17 ऑक्टोबर (हिं.स.)। अहमदपूर-चाकूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तथा महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री रामचंद्रराव शंकरराव पाटील अंधोरीकर यांचे शनिवार, दि. १७ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास वयाच्या ९७ व्या वर्षी अल्पशा आजार
रामचंद्र पाटील


लातूर, 17 ऑक्टोबर (हिं.स.)।

अहमदपूर-चाकूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तथा महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री रामचंद्रराव शंकरराव पाटील अंधोरीकर यांचे शनिवार, दि. १७ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास वयाच्या ९७ व्या वर्षी अल्पशा आजाराने त्यांच्या राहत्या घरी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने अहमदपूर तालुक्यासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

त्यांच्या पार्थिवावर अहमदपूर तालुक्यातील मूळ गावी अंधोरी येथे शनिवारी सायंकाळी सहा वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवर, राजकीय नेते, कार्यकर्ते, नातेवाईक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्वातंत्र्यसैनिकांचे संस्कार अन् सार्वजनिक जीवनातील वाटचाल

रामचंद्रराव पाटील अंधोरीकर हे स्वातंत्र्यसैनिक स्वर्गीय शंकरराव पाटील यांचे चिरंजीव होते. आर्य समाजी गुरुकुलात शिक्षण घेतलेल्या अंधोरीकर यांच्यावर सामाजिक जाणीव, शिस्त आणि सार्वजनिक सेवेचे संस्कार झाले होते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून त्यांनी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात दीर्घकाळ योगदान दिले.

त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून झाली. तत्कालीन उस्मानाबाद, आताच्या धाराशिव जिल्हा परिषदेत किनगाव जिल्हा परिषद गटातून ते १९७९ ते १९८४ या कालावधीत काँग्रेसच्या वतीने सदस्य म्हणून निवडून आले. या काळात त्यांनी जिल्हा परिषदेचे आरोग्य व बांधकाम सभापती म्हणून जबाबदारी सांभाळली. या पदावर कार्यरत असताना त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटविला.

आमदार ते राज्यमंत्री; दारूबंदी खात्याची जबाबदारी

१९८५ ते १९९० या कालावधीत अहमदपूर-चाकूर विधानसभा मतदारसंघातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने ते विधानसभेवर निवडून आले. आमदार म्हणून काम करताना त्यांनी मतदारसंघातील जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य दिले.

तत्कालीन मुख्यमंत्री स्वर्गीय शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या मंत्रिमंडळात त्यांना राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. महाराष्ट्र शासनात त्यांनी दारूबंदी राज्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली. याशिवाय परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय कार्य केले.

जिल्हा परिषद सदस्य, सभापती, आमदार आणि राज्यमंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला. ग्रामीण भागातील जनतेशी असलेला संपर्क आणि सार्वजनिक जीवनातील त्यांचा अनुभव यामुळे त्यांनी राजकारणात स्वतंत्र ओळख निर्माण केली.

अंधोरी येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

रामचंद्रराव पाटील अंधोरीकर यांच्या निधनाची बातमी समजताच त्यांच्या मूळ गावी अंधोरीसह अहमदपूर परिसरातील नागरिकांनी शोक व्यक्त केला. त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी सहा वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्रशासनाच्या वतीने तहसीलदार उज्वलाताई पांगरकर यांनी पुष्पचक्र अर्पण करून दिवंगत नेत्यांना श्रद्धांजली वाहिली.

कुटुंबीयांच्या मागे मोठा परिवार

रामचंद्रराव पाटील अंधोरीकर यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे आणि परतवंडे असा मोठा परिवार आहे. लातूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अॅड. हेमंत पाटील आणि छत्रपती संभाजीनगर येथील अॅड. जयंत पाटील यांचे ते वडील होत.

त्यांच्या निधनाने एका ज्येष्ठ राजकीय नेतृत्वाची आणि सार्वजनिक जीवनात दीर्घकाळ योगदान देणाऱ्या व्यक्तिमत्त्वाची उणीव निर्माण झाली आहे. त्यांच्या कार्याच्या आठवणींना उजाळा देत अहमदपूरसह परिसरातील नागरिकांकडून दुःख व्यक्त केले जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande