
पैरा आशियाई स्पर्धेत पदक जिंकण्याचे सचिन चमारिया यांचे लक्ष्य
राष्ट्रीय स्तरावर सलग सहा सुवर्णपदकांची कमाई आंतरराष्ट्रीय बोकिया स्पर्धांमध्येही उल्लेखनीय कामगिरी
वयाच्या अवघ्या १७व्या वर्षी पाठीच्या कण्याला गंभीर दुखापत झाल्याने सचिन चमारिया यांच्या आयुष्याला अनपेक्षित वळण मिळाले. या अपघातामुळे त्यांच्या चारही हात-पायांना पक्षाघात झाला. मात्र, या कठीण परिस्थितीसमोर हार न मानता त्यांनी स्वतःच्या क्षमतांचा शोध घेण्याचा आणि आयुष्याला नवी दिशा देण्याचा निर्णय घेतला. वर्ष २०२१ मध्ये बोकिया या खेळाशी जोडले गेल्यानंतर त्यांनी स्पर्धात्मक क्रीडा क्षेत्रात पुनरागमन केले. सातत्यपूर्ण सराव, मेहनत आणि जिद्दीच्या बळावर त्यांनी राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. सचिन यांनी आतापर्यंत सलग सहा वेळा राष्ट्रीय सुवर्णपदक जिंकण्याची कामगिरी केली आहे.
वर्ष २०२४ मध्ये बहरीन येथे आयोजित जागतिक बोकिया चॅलेंजर स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक मिळवणारे भारतातील पहिले पुरुष बीसी-३ खेळाडू होण्याचा मान त्यांनी मिळवला. त्यानंतर वर्ष २०२६ मध्ये कैरो येथे झालेल्या जागतिक बोकिया चॅलेंजर स्पर्धेत त्यांनी सरिता द्विवेदी यांच्या साथीने बीसी-३ दुहेरी प्रकारात रौप्यपदक, तर वैयक्तिक प्रकारात कांस्यपदक पटकावले. जागतिक क्रमवारीत १९व्या स्थानावर असलेले सचिन हे भारतीय बोकिया खेळाडूंमध्ये सर्वोच्च क्रमांकावर आहेत.
आता १८ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या आयची-नागोया पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये सचिन भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. ते बीसी-३ गटातील वैयक्तिक आणि दुहेरी अशा दोन्ही प्रकारांत सहभागी होतील. क्रीडा क्षेत्रातील यशाबरोबरच दिव्यांग व्यक्तींचा समावेश, समान संधी आणि त्यांना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठीही ते प्रयत्नशील आहेत.
भारतीय बोकिया खेळाडू सचिन चमारिया यांच्याशी ‘हिंदुस्थान समाचार’ने साधलेल्या संवादातील महत्त्वाचे अंश पुढीलप्रमाणे.
प्रश्न : - वयाच्या १७व्या वर्षी पाठीच्या कण्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे तुमचे आयुष्य पूर्णपणे बदलले. त्या कठीण काळातून बाहेर पडून आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करण्यापर्यंतचा प्रवास कसा होता?
सचिन :- पाठीच्या कण्याला दुखापत झाल्यानंतर माझ्या आयुष्यात अनेक बदल झाले. परिस्थितीशी जुळवून घेणे आणि पुढे जाण्यासाठी नवे मार्ग शोधणे आवश्यक होते. बोकिया या खेळाशी जोडले जाणे माझ्यासाठी अशीच एक संधी ठरली. या खेळामुळे मला स्वतःच्या क्षमतांची जाणीव झाली आणि आयुष्याला नवी दिशा मिळाली. २०२१ मध्ये या खेळाची ओळख झाल्यानंतर मी हळूहळू सराव आणि तयारीवर लक्ष केंद्रित करू लागलो. आज भारताचे प्रतिनिधित्व करणे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पदके जिंकणे ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. या प्रवासातून मला शिकायला मिळाले की योग्य संधी, सातत्यपूर्ण सराव आणि ध्येयाप्रती असलेली बांधिलकी यांमुळे पुढे जाण्याचा मार्ग सुकर होतो.
प्रश्न :- वर्ष २०२१ मध्ये तुम्ही बोकिया खेळाशी जोडले गेलात. या खेळातील कोणत्या वैशिष्ट्यांनी तुम्हाला आकर्षित केले? सुरुवातीपासूनच आंतरराष्ट्रीय पदक जिंकण्याचे स्वप्न होते का ?
सचिन :- बोकिया या खेळामुळे मला माझ्या क्षमतांचा वेगळ्या पद्धतीने उपयोग करण्याची संधी मिळाली. या खेळात केवळ शारीरिक कौशल्य महत्त्वाचे नसते, तर अचूकता, रणनीती, एकाग्रता आणि दबावाच्या परिस्थितीत योग्य निर्णय घेण्याची क्षमताही तितकीच महत्त्वाची असते. या वैशिष्ट्यांमुळेच मला बोकियाची आवड निर्माण झाली. सुरुवातीला माझे लक्ष खेळ समजून घेणे, तंत्र सुधारणे आणि एक चांगला खेळाडू बनणे यावर होते. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतासाठी पदक जिंकणे ही मोठी उपलब्धी आहे. २०२४ मध्ये बहरीन येथे सुवर्णपदक जिंकणे आणि २०२६ मध्ये कैरो येथे दोन पदके मिळवणे हे माझ्या कारकिर्दीतील महत्त्वाचे टप्पे आहेत.
प्रश्न : -कैरो येथे झालेल्या जागतिक बोकिया चॅलेंजर स्पर्धा २०२६ मध्ये रौप्य आणि कांस्यपदक जिंकणे तुमच्यासाठी किती विशेष होते? या स्पर्धेतून काय शिकायला मिळाले ?
सचिन : -कैरो येथे दोन पदके जिंकणे माझ्यासाठी अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची बाब होती. सरिता द्विवेदी यांच्या साथीने बीसी-३ दुहेरी प्रकारात रौप्यपदक, तर बीसी-३ वैयक्तिक प्रकारात कांस्यपदक मिळवले. या यशामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील माझ्या तयारीची आणि खेळाची चाचणी घेण्याची संधी मिळाली. बोकियामध्ये केवळ एखादा अचूक फटका मारणे महत्त्वाचे नसते. संपूर्ण सामन्यात योग्य रणनीती कायम ठेवणे, प्रतिस्पर्ध्याची चाल समजून घेणे आणि दबावाखालीही एकाग्र राहणे आवश्यक असते. प्रत्येक गुणासाठी संयम आणि अचूकता राखून खेळणे किती महत्त्वाचे आहे, हे या स्पर्धेतून शिकायला मिळाले. ही दोन्ही पदके माझ्यासाठी यशाची पावती असण्याबरोबरच भविष्यात आणखी चांगली कामगिरी करण्याची प्रेरणाही आहेत.
प्रश्न :- आयची-नागोया पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा तुमच्यासाठी काय अर्थ आहे? पदकाबाबत तुमच्या अपेक्षा काय आहेत ?
सचिन : -आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणे ही माझ्यासाठी अभिमानाची आणि जबाबदारीची बाब आहे. बीसी-३ वैयक्तिक आणि दुहेरी अशा दोन्ही प्रकारांत सर्वोत्तम कामगिरी करण्याचा माझा प्रयत्न असेल. कैरो येथे मिळालेल्या पदकांमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा करण्याचा मौल्यवान अनुभव मिळाला आहे. त्याचा उपयोग या स्पर्धेत करण्याची माझी इच्छा आहे. प्रत्येक सामन्यात आखलेल्या रणनीतीनुसार खेळणे, अचूक फटके मारणे आणि पदकाच्या शर्यतीत भारताला मजबूत स्थितीत ठेवणे हे माझे ध्येय आहे. आशियाई स्तरावरील स्पर्धा अत्यंत आव्हानात्मक असते आणि अनेक अनुभवी खेळाडू त्यात सहभागी होतात. त्यामुळे एखाद्या विशिष्ट प्रतिस्पर्ध्यावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी स्वतःची तयारी, एकाग्रता आणि सामन्यादरम्यान घेतले जाणारे निर्णय यांना अधिक महत्त्व देणे आवश्यक आहे.
प्रश्न : - भारतात बोकिया हा खेळ अद्याप फारसा लोकप्रिय नाही. यामागील सर्वांत मोठे कारण काय आहे, असे तुम्हाला वाटते ?
सचिन : -माझ्या मते, भारतात बोकिया खेळाच्या विकासासमोरील सर्वांत मोठी आव्हाने म्हणजे या खेळाविषयी मर्यादित जनजागृती आणि खेळाडूंसाठी सुलभ प्रशिक्षण सुविधांचा अभाव. अनेकांना या खेळाची आणि बीसी-३ सारख्या गटांतील खेळाडूंच्या विशिष्ट गरजांची पुरेशी माहिती नाही. याशिवाय, रॅम्पसारखी विशेष उपकरणे, प्रशिक्षित क्रीडा सहाय्यक, तज्ज्ञ प्रशिक्षक आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी आर्थिक मदत आवश्यक असते. या सर्व बाबींसाठी खर्च येत असल्याने प्रायोजक आणि संस्थात्मक सहकार्याची भूमिकाही महत्त्वाची आहे. शाळा, क्रीडा संस्था आणि दिव्यांग व्यक्तींसाठी कार्य करणाऱ्या संघटनांच्या माध्यमातून हा खेळ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवला आणि खेळाडूंना नियमित प्रशिक्षण दिले, तर भारतातील बोकियाचा पाया अधिक मजबूत होऊ शकतो.
प्रश्न :- बीसी-३ गटातील खेळाडूंना रॅम्प, विशेष उपकरणे आणि क्रीडा सहाय्यकांची गरज असते. भारतात आंतरराष्ट्रीय स्तरावरील तयारीसाठी पुरेशा सुविधा उपलब्ध आहेत का ?
सचिन :- बीसी-३ गटात स्पर्धा करण्यासाठी खेळाडूच्या वैयक्तिक गरजांनुसार रॅम्प, योग्य क्रीडा उपकरणे आणि प्रशिक्षित क्रीडा सहाय्यक उपलब्ध असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा करण्यासाठी केवळ उपकरणे उपलब्ध असणे पुरेसे नाही. त्यांचा नियमित वापर करण्याची, तंत्र विकसित करण्याची आणि वेगवेगळ्या सामन्यांच्या परिस्थितीत सराव करण्याची संधीही मिळायला हवी. भारतात बोकियासाठी अधिक सक्षम प्रशिक्षण व्यवस्था उभारण्याची गरज आहे. विशेष उपकरणांची उपलब्धता, प्रशिक्षित क्रीडा सहाय्यक आणि तज्ज्ञ प्रशिक्षक तयार करणे, नियमित प्रशिक्षण शिबिरे आयोजित करणे आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांचा अनुभव मिळवून देणे या गोष्टींना प्राधान्य दिले पाहिजे. खेळाडूंना त्यांच्या गरजांनुसार प्रशिक्षण आणि आवश्यक साधने मिळाली, तर ते आपल्या क्षमतेनुसार अधिक चांगली कामगिरी करू शकतील.
प्रश्न : -भारतात दिव्यांग खेळाडूंना क्रीडा क्षेत्रात व्यावसायिक कारकीर्द घडवण्याच्या आणि आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्याच्या पुरेशा संधी आहेत का? सरकार आणि क्रीडा महासंघांकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत ?
सचिन : -भारतात दिव्यांग खेळाडूंना व्यावसायिक कारकीर्द घडवण्याच्या संधी विकसित होत आहेत; मात्र, त्या अधिक बळकट करण्याची गरज आहे. केवळ स्पर्धांमध्ये सहभागी होणे पुरेसे नसते. नियमित प्रशिक्षण, आवश्यक उपकरणे, प्रवास आणि स्पर्धांशी संबंधित खर्चासाठी आर्थिक मदत तसेच पुढे जाण्यासाठी स्पष्ट संधी मिळणेही आवश्यक असते. सरकार आणि क्रीडा महासंघांनी सुरुवातीच्या टप्प्यापासून आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत खेळाडूंना सातत्याने सहकार्य करावे, अशी माझी अपेक्षा आहे. खासगी कंपन्या आणि प्रायोजकांनीही दिव्यांग खेळाडूंशी दीर्घकालीन संबंध प्रस्थापित करण्यासाठी पुढाकार घ्यावा. कामगिरीच्या आधारे प्रोत्साहन, रोजगाराच्या संधी आणि आर्थिक सुरक्षितता मिळाली, तर खेळाडूंना आपल्या खेळावर अधिक लक्ष केंद्रित करता येईल आणि स्वावलंबनाच्या दिशेने वाटचाल करता येईल.
प्रश्न : -गुणवत्तेच्या आणि कामगिरीच्या आधारे तुम्ही जागतिक बोकिया अजिंक्यपद स्पर्धा २०२६ साठी पात्र ठरलात. जगातील अव्वल खेळाडूंसमोर स्पर्धा करताना तुमची सर्वांत मोठी ताकद आणि कमकुवत बाजू कोणती जाणवली ?
सचिन :- गुणवत्तेच्या आणि कामगिरीच्या आधारे जागतिक बोकिया अजिंक्यपद स्पर्धेसाठी पात्र ठरणे हा माझ्या कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा आहे. वैयक्तिकदृष्ट्या ही उपलब्धी माझ्यासाठी विशेष आहे. भारतीय बोकियाच्या दृष्टीनेही ती महत्त्वाची आहे, कारण भारतीय खेळाडू आपल्या कामगिरीच्या जोरावर जागतिक स्तरावरील स्पर्धांपर्यंत पोहोचू शकतात, हे यातून स्पष्ट होते. जगातील अव्वल खेळाडूंशी स्पर्धा करण्यासाठी अचूकता, रणनीतीचा विचार आणि दबावाखाली एकाग्रता राखणे अत्यंत आवश्यक आहे. खेळ समजून घेणे, परिस्थितीनुसार रणनीती आखणे आणि प्रत्येक सामन्यातून शिकणे या गोष्टींना मी माझी ताकद मानतो. जागतिक स्तरावर खेळताना तांत्रिक बाबी आणि सामन्यांतील वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये आणखी सुधारणा करण्याची गरजही लक्षात येते. अशा अनुभवांमुळे स्वतःच्या उणिवांवर काम करून पुढील स्पर्धांसाठी अधिक चांगली तयारी करता येते.
प्रश्न :- सातत्याने मोठ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होताना शारीरिक तयारी, मानसिक एकाग्रता आणि कामगिरीतील सातत्य टिकवून ठेवणे किती आव्हानात्मक असते ?
सचिन :- मोठ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सातत्याने सहभागी होण्यासाठी शारीरिक तयारीबरोबरच मानसिक एकाग्रता आणि कामगिरीतील सातत्य राखणेही आवश्यक असते. बोकियामध्ये दीर्घकाळ लक्ष केंद्रित करणे, प्रत्येक फटक्यासाठी योग्य रणनीती आखणे आणि दबावाखाली शांत राहणे महत्त्वाचे असते. एका स्पर्धेनंतर दुसऱ्या स्पर्धेची तयारी करताना मागील कामगिरीचे विश्लेषण करणे आणि ज्या बाबींमध्ये सुधारणा आवश्यक आहे, त्यावर काम करणे गरजेचे असते. माझ्या तयारीमध्ये तंत्र, रणनीती आणि एकाग्रतेवर विशेष भर असतो. त्याचबरोबर पुरेशी विश्रांती आणि सराव यांचा समतोल राखणेही महत्त्वाचे आहे, जेणेकरून पुढील स्पर्धेसाठी चांगल्या प्रकारे सज्ज होता येईल. माझ्या मते, सातत्यपूर्ण कामगिरी ही केवळ एका चांगल्या प्रदर्शनातून साध्य होत नाही, तर नियमित तयारी आणि सतत शिकण्याच्या प्रक्रियेतून घडते.
प्रश्न :- तुमच्या प्रवासात दिव्यांगत्वाबाबत समाजाचा दृष्टिकोन तुम्ही कसा अनुभवला ? दिव्यांग खेळाडूंकडे समाजाने कोणत्या दृष्टिकोनातून पाहावे, असे तुम्हाला वाटते ?
सचिन :- दिव्यांगत्व ही एखाद्या व्यक्तीची संपूर्ण ओळख असू शकत नाही, असे मला वाटते. खेळाडूची खरी ओळख त्याची मेहनत, कौशल्य, शिस्त आणि कामगिरी यांवरून ठरली पाहिजे. समाजात जागरूकता वाढत असताना दिव्यांग खेळाडूंना पुढे जाण्यासाठी समान संधी, सुलभ सुविधा आणि आवश्यक सहकार्य मिळणेही तितकेच महत्त्वाचे आहे. लोकांनी केवळ दिव्यांगत्वाकडे लक्ष न देता खेळाडूची प्रतिभा आणि त्याने मिळवलेल्या यशाचाही विचार करावा, अशी माझी इच्छा आहे. बोकिया या खेळामुळे मला स्वतःच्या क्षमतांचा विकास करण्याची आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. माझ्या कामगिरीमुळे अधिकाधिक लोकांना या खेळाची माहिती मिळेल आणि दिव्यांग खेळाडूंकडे त्यांच्या प्रतिभेच्या आधारे पाहण्याची प्रेरणा मिळेल, अशी आशा आहे.
प्रश्न : -एखाद्या दिव्यांग तरुणाला क्रीडा क्षेत्रात भविष्य घडवायचे आहे; मात्र, साधनसंपत्तीच्या अभावामुळे तो पुढे जाण्यास धजावत नाही. अशा तरुणांना तुम्ही काय संदेश द्याल ?
सचिन :- अशा तरुणांना मी एवढेच सांगू इच्छितो की साधनसंपत्तीचा अभाव हे वास्तवातील आव्हान आहे; परंतु त्यामुळे स्वतःमधील क्षमता ओळखण्यापासून आणि उपलब्ध संधी शोधण्यापासून मागे हटू नये. क्रीडा क्षेत्रात पुढे जाण्यासाठी योग्य मार्गदर्शन, सराव आणि सहकार्य आवश्यक असते. त्यामुळे स्थानिक क्रीडा संघटना, प्रशिक्षक आणि दिव्यांग खेळाडूंसाठी काम करणाऱ्या संस्थांशी संपर्क साधणे ही चांगली सुरुवात ठरू शकते. भारतात बोकिया खेळाला व्यापक ओळख मिळावी आणि अधिकाधिक दिव्यांग खेळाडूंना या क्षेत्रात पुढे जाण्याची संधी मिळावी, हे माझे स्वप्न आहे. देशात सक्षम प्रशिक्षण सुविधा, तज्ज्ञ प्रशिक्षक, उत्तम उपकरणे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा करण्याच्या पुरेशा संधी उपलब्ध व्हाव्यात, अशी माझी इच्छा आहे. त्यामुळे भारतीय खेळाडूंना नियमितपणे जागतिक स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करता येईल.
प्रश्न :- भारतातील बोकिया खेळाच्या भविष्याबाबत तुमचे सर्वांत मोठे स्वप्न काय आहे? आगामी काळात या खेळाचे चित्र कसे असावे, असे तुम्हाला वाटते ?
सचिन :- भारतात बोकिया खेळाला व्यापक ओळख मिळावी आणि अधिकाधिक दिव्यांग खेळाडूंना या खेळात पुढे जाण्याची संधी मिळावी, हे माझे सर्वांत मोठे स्वप्न आहे. खेळाडूंना उत्तम प्रशिक्षण सुविधा, तज्ज्ञ प्रशिक्षक, योग्य उपकरणे आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होण्याच्या पुरेशा संधी मिळाव्यात, असे मला वाटते. देशांतर्गत स्पर्धाही भारतीय बोकियाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावतात. फेडरेशन कपसारख्या स्पर्धांमुळे खेळाडूंना स्पर्धेचा अनुभव मिळतो, स्वतःच्या तंत्राची चाचणी घेता येते आणि इतर खेळाडूंकडून शिकण्याची संधी मिळते. मात्र, आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचण्यासाठी नियमित प्रशिक्षण, तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूंविरुद्ध खेळण्याच्या संधीही आवश्यक आहेत. नियोजनबद्ध प्रशिक्षण शिबिरे आणि कामगिरीच्या आधारे पुढे जाण्याचे स्पष्ट मार्ग तयार केले, तर अधिकाधिक भारतीय खेळाडू जागतिक स्तरावरील स्पर्धांसाठी सज्ज होऊ शकतील.
प्रश्न :- आयची-नागोया पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेतील तुमची कामगिरी भारतीय बोकियाच्या भविष्यासाठी कोणता संदेश देईल ?
सचिन :- कैरो येथे दोन पदके जिंकल्यानंतर आणि गुणवत्तेच्या आधारे जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी पात्र ठरल्यानंतर आता आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेतही सर्वोत्तम कामगिरी करण्याचा माझा प्रयत्न असेल. मी बीसी-३ वैयक्तिक आणि दुहेरी अशा दोन्ही प्रकारांत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. पदकाच्या शर्यतीत देशाला मजबूत स्थितीत ठेवणे हे माझे ध्येय आहे. त्यासाठी प्रत्येक सामन्यात अचूकता, रणनीती आणि एकाग्रता कायम राखावी लागेल. माझ्यासाठी ही स्पर्धा केवळ वैयक्तिक कामगिरी दाखवण्याची संधी नाही, तर भारतीय बोकिया खेळाला अधिक ओळख मिळवून देण्याचे व्यासपीठही आहे. आमच्या यशामुळे अधिकाधिक दिव्यांग तरुणांना खेळाशी जोडले जाण्याची प्रेरणा मिळावी आणि योग्य प्रशिक्षण, साधनसंपत्ती व संधी उपलब्ध झाल्यास भारतीय खेळाडूही आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले स्थान निर्माण करू शकतात, हा संदेश समाजापर्यंत पोहोचावा, अशी माझी इच्छा आहे.
मुलाखत : सुनील दुबे
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी