भारतात अराजकतेतून सत्तांतर अशक्य : डॉ. मोहन भागवत
नागपूर येथे संघाच्या विजयादशमी उत्सवात राष्ट्रहिताचा संदेश नागपूर, 20 ऑक्टोबर (हि.स.) : भारतात सामाजिक सौहार्द आणि संविधानाच्या चौकटीत निवडणूक प्रक्रियेद्वारे सत्तांतर शक्य आहे. मात्र, आपल्या देशात अराजकतेतून कधीही सत्तांतर झालेले नाही आणि भविष्या
सरसंघचालक डॉ मोहन भागवत नागपुर मे आयोजित विजयादशमी महोत्सव मे पाथेय देते हुए


नागपूर येथे संघाच्या विजयादशमी उत्सवात राष्ट्रहिताचा संदेश

नागपूर, 20 ऑक्टोबर (हि.स.) : भारतात सामाजिक सौहार्द आणि संविधानाच्या चौकटीत निवडणूक प्रक्रियेद्वारे सत्तांतर शक्य आहे. मात्र, आपल्या देशात अराजकतेतून कधीही सत्तांतर झालेले नाही आणि भविष्यातही होणार नसल्याचे प्रतिपादन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. नागपूरच्या रेशीमबाग मैदानावर आयोजित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवात ते बोलत होते.

याप्रसंगी देशातील आणि जगातील सद्यःपरिस्थिती तसेच विविध समस्यांवर विचार मांडताना सरसंघचालक म्हणाले की, पाश्चात्त्य जगाच्या प्रेरणेने आणि अप्रत्यक्ष हस्तक्षेपामुळे जगातील अनेक देशांमध्ये उलथापालथ होत आहे. नेपाळ, बांगलादेश, अल्बानिया आणि फ्रान्समध्ये व्यवस्थापरिवर्तनाच्या नावाखाली सुरू असलेल्या हिंसक घडामोडी आणि सत्तांतराचे प्रयत्न आपण पाहत आहोत. भारतातही असे अयशस्वी प्रयत्न होत आहेत.

डॉ. भागवत यांच्या मते, पाश्चात्त्य जगातील काही शक्ती व्यवस्था, सांस्कृतिक मूल्ये आणि मानवी संस्कार कमकुवत करू इच्छितात. सत्तांतराच्या माध्यमातून परिस्थिती बदलण्याचा दावा केला जातो. मात्र, केवळ सत्ता किंवा शासन बदलल्याने समस्यांचे कायमस्वरूपी निराकरण होत नाही. देशाला कोणत्याही प्रकारच्या अव्यवस्थेपासून आणि विभाजनवादी प्रवृत्तींपासून वाचवण्यासाठी समाजाने सतर्क राहिले पाहिजे, असे आवाहन सरसंघचालकांनी केले.

आंदोलनाचा उद्देश समस्येचे निराकरण असावा

आंदोलनांच्या भूमिकेवर बोलताना भागवत म्हणाले की, आंदोलनाचा उद्देश समस्येचे निराकरण हा असला पाहिजे. एखाद्या समस्येच्या निराकरणासाठी समाजाने किंवा एखाद्या समूहाने आंदोलन करणे स्वाभाविक आहे. मात्र, आंदोलनाची दिशा आणि त्यामागील उद्देश यांचाही विचार करणे तितकेच आवश्यक आहे.

आंदोलन करणारे समूह आणि शांतता व सुव्यवस्था राखणारे शासन या दोघांचीही जबाबदारी आहे की, त्यांच्या कृतींमुळे समाजात अनावश्यक संघर्ष आणि वैमनस्य निर्माण होऊ नये, असे त्यांनी सांगितले.

तीव्र भावना व्यक्त होत असतानाही संविधानाच्या मर्यादांचे पालन झाले पाहिजे, असा इशाराही त्यांनी दिला. बोलणे, वागणे आणि सार्वजनिक व्यवहारांमध्ये संयम आवश्यक आहे. मते मिळवणे, स्वस्त लोकप्रियता मिळवणे अथवा राजकीय लाभ उठवण्याची इच्छा विवेक आणि सद्भावनेवर वरचढ ठरता कामा नये. एखाद्या वास्तविक समस्येचे निराकरण करण्याऐवजी आंदोलनाचा वापर अन्य राजकीय उद्दिष्ट साध्य करण्यासाठी होऊ लागला, तर त्याचा मूळ हेतू मागे पडू शकतो, असे त्यांनी नमूद केले.

विविधतेतील एकताच भारताची ओळख

देशाच्या एकात्मतेवर भर देताना भागवत म्हणाले की, भारतात विविध भाषा बोलणारे तसेच वेगवेगळ्या धर्मांचे, जातींचे आणि परंपरांचे लोक राहतात. असे असतानाही देशाला जोडणारी सामायिक सामाजिक आणि भावनिक ओळख हे भारताचे महत्त्वाचे वैशिष्ट्य राहिले आहे.

विविधता स्वीकारणे आणि तिचे संरक्षण करणे हा भारतीय समाजाच्या परंपरेचा भाग आहे, असे त्यांनी सांगितले.

संविधानाच्या उद्देशिकेतील ‘आम्ही भारताचे लोक’ या शब्दांचा उल्लेख करत त्यांनी सामायिक राष्ट्रीय ओळख आणि परस्परांतील बंध यांचे महत्त्व अधोरेखित केले. समाजातील भावनिक एकात्मता कमकुवत झाल्यास त्याच्या सामूहिक शक्तीवरही परिणाम होतो. त्यामुळे मतभेद असूनही परस्परांचा आदर आणि सद्भाव कायम राखणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.

वंदे मातरम्‌बाबत कोणतीही हरकत नसावी

राष्ट्रीय गीत वंदे मातरम्‌बाबत बोलताना भागवत म्हणाले की, लॉर्ड कर्झन यांनी धार्मिक आधारावर बंगालची फाळणी केली होती. याच काळात ‘वंदे मातरम्’ हे एकता आणि देशभक्तीचे प्रतीक म्हणून पुढे आले. परिणामी, इंग्रजांना आपला निर्णय मागे घ्यावा लागला आणि बंगालच्या फाळणीचा प्रयत्न अयशस्वी ठरला.

मात्र, १९४७ मध्ये असे घडले नाही. लोक द्वेषाच्या भावनेत बुडाले आणि राष्ट्रीय एकतेला विसरले. परिणामी, देशाची फाळणी झाली, असे त्यांनी सांगितले.

सरसंघचालकांच्या मते, बंगालच्या फाळणीचा डाव उधळून लावणारे वंदे मातरम् आजही एकतेची तीच प्रभावी प्रेरणा देत आहे. हे आपले राष्ट्रगीत आहे आणि ते संपूर्णपणे, अभिमानाने व बुलंद आवाजात गाण्यास कोणताही संकोच किंवा आक्षेप असता कामा नये, असे ते म्हणाले.

व्यसनाधीनता ही गंभीर राष्ट्रीय समस्या

तरुणांमध्ये वाढत असलेल्या व्यसनाधीनतेबद्दल आणि अमली पदार्थांच्या वाढत्या प्रभावाबद्दल सरसंघचालकांनी चिंता व्यक्त केली. विवेक आणि नैतिक मूल्यांच्या अभावामुळे तरुण पिढी व्यसनांच्या आहारी जात आहे. ही समस्या केवळ एखाद्या कुटुंबापुरती मर्यादित नसून एक गंभीर राष्ट्रीय आव्हान आहे. त्यावर मात करण्यासाठी शासन, प्रशासन आणि समाजाने एकत्रितपणे निर्णायक प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.

नव्या पिढीमध्ये नैतिक मूल्ये आणि सद्विवेक जागृत ठेवणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी आहे. व्यसनांविरोधात देशव्यापी जनजागृती आणि प्रतिबंधात्मक मोहीम राबवण्यासाठी संघाचे स्वयंसेवकही प्रयत्न करतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

पंचपरिवर्तन दैनंदिन जीवनात अंगीकारण्यावर भर

संघाच्या शताब्दी वर्षादरम्यान करण्यात आलेल्या कार्यांचा उल्लेख करताना डॉ. भागवत यांनी सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधन, पर्यावरण संरक्षण, स्वबोध व स्वदेशी आणि नागरिक कर्तव्यपालन या पाच सूत्रांवर भर दिला.

पंचपरिवर्तन हे केवळ एका वर्षापुरते मर्यादित असलेले अभियान नसून ते दैनंदिन जीवनाचा भाग बनवले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

विज्ञान, तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वाढत्या वापराबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, या क्षेत्रांमध्ये नैतिक शिस्त आणि विवेकही तितकेच आवश्यक आहेत. असत्य पसरवण्यासाठी किंवा लोकांची दिशाभूल करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर होता कामा नये. याबाबत समाजाने सतर्क राहण्याची गरज आहे.

अनेक प्रमुख मान्यवरांची उपस्थिती

या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ संपादक संजय गुप्ता उपस्थित होते. याशिवाय संघाचे विदर्भ प्रांत संघचालक दीपक तामशेट्टीवार, विदर्भ प्रांत सहसंघचालक श्रीधर गाडगे आणि नागपूर महानगर संघचालक राजेश लोया यांच्यासह माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड तसेच इस्रायलचे मिडवेस्ट इंडिया येथील कॉन्सुल जनरल यानिव रेवाच उपस्थित होते.

या समारंभात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि राष्ट्र सेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधींनी सहभाग घेतला.

मुख्यमंत्री फडणवीस, केंद्रीय मंत्री गडकरी, बावनकुळे आणि आमदार फुके हे संघाच्या गणवेशात समारंभाला उपस्थित होते.

---------------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande