शेतकरी, कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नांवरून उद्धव ठाकरेंची सरकारवर टीका
मुंबईत आयोजित दसरा मेळाव्यातून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल मुंबई, 20 ऑक्टोबर (हिं.स.) । शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा-गट) गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी दसऱ्याच्या मुहूर्तावर मुंबईच्या शिवाजीपार्क मैदानावर सभा घेतली. यावेळी त्यांनी शेतक
उद्धव ठाकरे,  शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख


मुंबईत आयोजित दसरा मेळाव्यातून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

मुंबई, 20 ऑक्टोबर (हिं.स.) । शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा-गट) गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी दसऱ्याच्या मुहूर्तावर मुंबईच्या शिवाजीपार्क मैदानावर सभा घेतली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांपासून राज्यातील कायदा-सुव्यवस्थेपर्यंत विविध मुद्द्यांवरून सत्ताधाऱ्यांवर टीका केली.

शेतकऱ्यांना देण्यात येणारी 5 हजार रुपयांची मदत म्हणजे दिलासा नसून त्यांची थट्टा असल्याचा आरोप त्यांनी केला. पीक पंचनामे, रखडलेली कर्जमाफी, नमो किसान योजनेची अपूर्ण अंमलबजावणी आणि केंद्राच्या पथकाच्या कामकाजावरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. दसऱ्याच्या दिवशी सोनं लुटण्याची परंपरा ही सोन्यासारखं राहण्याचा संदेश देणारी आहे. मात्र, दुसरीकडे पंतप्रधानांकडून सोनं खरेदी न करण्याचं आवाहन केलं जात असल्याकडे लक्ष वेधत ठाकरे यांनी सरकारच्या भूमिकेवर टीका केली. निवडणुकीत मतांची चोरी होत असल्याचा आरोप करत, आता आणखी काय लुटायचं बाकी ठेवलं आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. कितीही दरोडेखोर आले तरी शिवसेनेचा भगवा कोणीही चोरू शकत नाही, असं सांगत हा भगवा महाराष्ट्रासह दिल्लीतही फडकवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

तरुणांना ‘शहरी नक्षलवादी’ ठरवण्यावरून टीका

आंदोलन करणाऱ्या तरुणांना आणि विद्यार्थ्यांना ‘शहरी नक्षलवादी’ ठरवलं जात असल्याबद्दल उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला शहरी नक्षलवादाचा शिक्का मारण्याचं धाडस कसं होतं, असा सवाल त्यांनी केला. हातात तिरंगा घेऊन न्यायाची मागणी करणाऱ्या तरुणांना रोखलं जात असल्याचा आरोप करत त्यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनाही ठाकरे यांनी सवाल केला. देश स्वतंत्र झाल्यानंतर नागपूर येथील संघाच्या मुख्यालयावर अनेक वर्षे तिरंगा का फडकवला जात नव्हता, अशी विचारणा त्यांनी केली.

टायगर श्रॉफवरील हल्ल्याचा मुद्दा उपस्थित

अभिनेता टायगर श्रॉफवरील हल्ल्याचा मुद्दा उपस्थित करत ठाकरे यांनी राज्यातील सुरक्षा व्यवस्थेवर टीका केली. हल्ल्यातील आरोपींना अटक केल्याबद्दल पोलिसांचं कौतुक करता येईल; मात्र शस्त्रांसह आलेल्या हल्लेखोरांना वेळीच रोखण्यात यंत्रणा अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केला. नाकाबंदी असतानाही आरोपी शस्त्रांसह घटनास्थळी पोहोचलेच कसे, असा सवाल करत त्यांनी सरकारला जाब विचारला.

जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्यास संताप वाढेल ठाकरे यांचा इशारा

जनतेला न्याय मिळत नसल्यामुळे नागरिक रस्त्यावर उतरतात आणि त्यांनाच नक्षलवादी ठरवलं जातं, अशी टीका ठाकरे यांनी केली. आंदोलनात सभ्यता असावी, असं सांगण्यापूर्वी नागरिकांच्या हक्कांचं संरक्षण होणं आवश्यक असल्याचं त्यांनी नमूद केलं. अन्याय वाढत राहिल्यास जनतेचा संताप उफाळून येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

शेतकरी, तरुण, विद्यार्थी आणि राज्यातील कायदा-सुव्यवस्थेच्या मुद्द्यांवरून उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं. विविध प्रश्नांवर सरकारच्या धोरणांबाबत त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांमुळे त्यांच्या भाषणात राज्यातील राजकीय आणि सामाजिक विषयांना महत्त्वाचं स्थान मिळालं.

-----------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande