‘खरी व्होटचोरी 2019 मध्येच झाली’- एकनाथ शिंदे
उद्धव ठाकरेंवर घणाघात, विरोधकांवरही जोरदार टीका मुंबई, 20 ऑक्टोबर (हिं.स.) : देशात खरी व्होटचोरी 2019 मध्ये झाली होती असा आरोप शिवसेनेचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांनी केला. मुंबईच्या गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये आयोजित शिवसेनेच्या दसरा मेळाव्
एकनाथ शिंदे, शिवसेना नेते


उद्धव ठाकरेंवर घणाघात, विरोधकांवरही जोरदार टीका

मुंबई, 20 ऑक्टोबर (हिं.स.) : देशात खरी व्होटचोरी 2019 मध्ये झाली होती असा आरोप शिवसेनेचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांनी केला. मुंबईच्या गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये आयोजित शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह काँग्रेस नेते राहुल गांधी आणि ‘इंडी’ आघाडीवर जोरदार टीका केली.

निवडणूक आयुक्तांच्या निवडणुका घेण्याच्या मागणीवरून उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना शिंदे म्हणाले की, उद्या महापालिका आयुक्तांच्या निवडणुका घेण्याची मागणीही केली जाऊ शकते. दुसऱ्यांकडे बोट दाखवण्यापूर्वी स्वतःच्या राजकीय प्रवासाकडे पाहण्याचा सल्ला त्यांनी दिला. उद्धव ठाकरे हे थेट जनतेतून निवडून आले नव्हते, तर विधानपरिषदेच्या माध्यमातून मुख्यमंत्री झाले होते, असा दावा करत त्यांनी २०१९ मधील सत्तांतरावरून ठाकरेंना लक्ष्य केले.

लंडन दौऱ्यावरील टीकेला प्रत्युत्तर

आपल्या लंडन दौऱ्यावरून होत असलेल्या टीकेलाही शिंदे यांनी उत्तर दिले. परदेश दौऱ्यातून महाराष्ट्राची प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न केल्याचे सांगत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. “मी लंडनला गेलो तरी यांच्या पोटात दुखतं, इंग्रजीत बोललो तरी पोटदुखी आणि साताऱ्याला माझ्या गावी गेलो तरी मळमळ सुरू होते,” अशा शब्दांत त्यांनी विरोधकांची खिल्ली उडवली. शेतकरी कुटुंबातील सामान्य कार्यकर्ता राज्याच्या नेतृत्वापर्यंत पोहोचल्यामुळे विरोधकांना आकस असल्याचा दावाही त्यांनी केला.

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारची भूमिका मांडली

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून विरोधकांकडून होत असलेल्या टीकेला उत्तर देताना शिंदे यांनी राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे सांगितले. संकटाच्या काळात शेतकऱ्यांना मदत करण्याचे काम सरकारने केले असून, राज्यातील कोणत्याही शेतकऱ्याची दिवाळी काळी होऊ देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राजकारण करण्याऐवजी त्यांना दिलासा देण्यावर सरकारचा भर असल्याचे त्यांनी नमूद केले.

मोदींच्या नेतृत्वाचे कौतुक; पाकिस्तानवरून विरोधकांना प्रत्युत्तरपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आंतरराष्ट्रीय नेतृत्वाचे कौतुक करताना शिंदे यांनी पाकिस्तानच्या आर्थिक परिस्थितीचा उल्लेख केला. भारताचा जागतिक स्तरावरील मान वाढल्याचे सांगत त्यांनी याचे श्रेय मोदी यांच्या कणखर धोरणांना दिले. पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय स्तरावर आर्थिक मदतीसाठी प्रयत्न करावे लागत असल्याचा संदर्भ देत त्यांनी भारताच्या बदलत्या जागतिक प्रतिमेवर भाष्य केले.

राहुल गांधी आणि ‘इंडा’ आघाडीवर टीकास्त्र

काँग्रेस नेते राहुल गांधी आणि ‘इंडिया’ आघाडीवर टीका करताना शिंदे यांनी न्यायव्यवस्था आणि विविध संस्थांबाबत विरोधक घेत असलेल्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. संविधान धोक्यात असल्याचा आरोप करून विरोधक देशात संभ्रम निर्माण करत असल्याचा दावा त्यांनी केला.

‘इंडिया’ आघाडीची तुलना दहा तोंडांच्या रावणाशी करत शिंदे यांनी या आघाडीवर जोरदार टीका केली.

पंतप्रधानांवर वैयक्तिक पातळीवर टीका करणे आणि ‘रेजीम चेंज’ची भाषा करणे हे देशप्रेमाचे लक्षण नसल्याचे ते म्हणाले. सत्ताबदलाचा निर्णय जनतेच्या हातात असून, विरोधकांना जनतेने निवडणुकांमध्ये नाकारल्याचा दावाही त्यांनी केला.

देशात आणीबाणी असल्याचा आरोप करणाऱ्या विरोधकांवरही शिंदे यांनी प्रश्न उपस्थित केले. देशभरात आंदोलने आणि रस्ते अडवण्याचे प्रकार सुरू असताना आणीबाणी असल्याची भाषा कशी केली जाते, असा सवाल त्यांनी केला.

दसरा मेळाव्यातून राजकीय संघर्ष तीव्र

एकनाथ शिंदे यांच्या भाषणात उद्धव ठाकरे यांच्यावरील टीका, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरील सरकारची भूमिका, पंतप्रधान मोदींचे नेतृत्व आणि काँग्रेससह ‘इंडिया’ आघाडीवरील आरोप हे प्रमुख मुद्दे ठरले. विविध राजकीय मुद्द्यांवरून विरोधकांना लक्ष्य करत शिंदे यांनी दसरा मेळाव्यातून शिवसेनेची भूमिका मांडली. त्यांच्या भाषणामुळे राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांमधील राजकीय संघर्ष पुन्हा चर्चेत आला.

-----------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande