आयसीसी टी२० आंतरराष्ट्रीय क्रमवारीत श्री चरणी आणि दीप्ती शर्माचे वर्चस्व कायम
दुबई, २० ऑक्टोबर, (हिं.स.) - भारतीय फिरकी गोलंदाज श्री चरणी आणि दीप्ती शर्मा यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) महिला टी२० आंतरराष्ट्रीय क्रमवारीत आपले वर्चस्व कायम राखले आहे. झिम्बाब्वेविरुद्धच्या घरच्या मालिकेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ
भारतीय फिरकीपटू श्री चरणी


दुबई, २० ऑक्टोबर, (हिं.स.) - भारतीय फिरकी गोलंदाज श्री चरणी आणि दीप्ती शर्मा यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) महिला टी२० आंतरराष्ट्रीय क्रमवारीत आपले वर्चस्व कायम राखले आहे. झिम्बाब्वेविरुद्धच्या घरच्या मालिकेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या वेगवान गोलंदाज नंदनी शर्मा आणि क्रांती गौड यांनीही गोलंदाज म्हणून आपल्या क्रमवारीत सुधारणा केली आहे.

वेगवान गोलंदाज नंदनी शर्माने २६ स्थानांची झेप घेत ४५ वे स्थान पटकावले आहे. तर क्रांती गौडनेही नऊ स्थानांची झेप घेत ४३ वे स्थान मिळवले आहे. दरम्यान, झिम्बाब्वेविरुद्ध किफायतशीर गोलंदाजी केल्यानंतर श्री चरणी आणि दीप्ती शर्मा यांनी अनुक्रमे आपले पहिले आणि दुसरे स्थान कायम राखले.

ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यातील ट्रान्स-टास्मान मालिकेच्या पहिल्या सामन्यानंतर टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीतही बदल झाले. ऑस्ट्रेलियाची ॲनाबेल सदरलँड आठव्या स्थानावर पोहोचली आहे. न्यूझीलंडची जेस केर पाच स्थानांनी सुधारून १७व्या स्थानावर, ब्री एलिंग सहा २३व्या स्थानावर, आणि नॅन्सी पटेल ३५व्या स्थानावर पोहोचली.

न्यूझीलंडच्या मॅडी ग्रीन आणि जॉर्जिया प्लायमर यांनीही टी-२० फलंदाजीच्या क्रमवारीत प्रगती केली. ग्रीन तीन स्थानांनी वर चढून ३४व्या स्थानावर, तर प्लायमर १३ स्थानांनी झेप घेत ४८व्या स्थानावर पोहोचली. पण, अनुभवी ऑस्ट्रेलियन फलंदाज बेथ मूनी ही जगातील अव्वल क्रमांकाची टी-२० आंतरराष्ट्रीय फलंदाज आहे.

बांग्लादेशविरुद्धची एकदिवसीय मालिका संपल्यानंतर ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंनी आपल्या एकदिवसीय क्रमवारीतही सुधारणा केली आहे. वेगवान गोलंदाज मेगन शट गोलंदाजांच्या क्रमवारीत एका स्थानाने वर चढून चौथ्या स्थानावर पोहोचली आहे. एलिस पेरी फलंदाजीच्या क्रमवारीत नवव्या स्थानावर, तर अष्टपैलू क्रिेकेटपटूंच्या क्रमवारीत २५व्या स्थानावर पोहोचली आहे.

ॲनाबेल सदरलँडनेही एकदिवसीय फलंदाजीच्या क्रमवारीत चार स्थानांची झेप घेतली आहे. मालिकेतील अंतिम सामन्यात नाबाद अर्धशतक झळकावल्यानंतर ती १३व्या स्थानावर पोहोचली. बांगलादेशची शर्मिन अख्तर गुप्ता २५व्या स्थानावर पोहोचली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande