डिसेंबरमध्ये कोणत्याही परिस्थितीत बांगलादेशात परतणारच - शेख हसीना
नवी दिल्ली , 20 ऑक्टोबर (हिं.स.)।बांगलादेशातील सत्तापालटानंतर देश सोडून गेलेल्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी आगामी डिसेंबर महिन्यात कोणत्याही परिस्थितीत बांगलादेशात परतणार असल्याचे जाहीर केले आहे. “मी डिसेंबरमध्ये बांगलादेशात परतणार आहे. मला भीत
डिसेंबरमध्ये बांगलादेशात परतणारच; शेख हसीना यांचा निर्धार


नवी दिल्ली , 20 ऑक्टोबर (हिं.स.)।बांगलादेशातील सत्तापालटानंतर देश सोडून गेलेल्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी आगामी डिसेंबर महिन्यात कोणत्याही परिस्थितीत बांगलादेशात परतणार असल्याचे जाहीर केले आहे. “मी डिसेंबरमध्ये बांगलादेशात परतणार आहे. मला भीती वाटत नाही. मला माहीत आहे की ते मला ठार मारू शकतात, अटक करू शकतात किंवा माझा छळ करू शकतात,” असे त्यांनी म्हटले. एका कार्यक्रमात आभासी माध्यमातून सहभागी होताना शेख हसीना यांनी हे वक्तव्य केले.

शेख हसीना म्हणाल्या, “मी डिसेंबरमध्ये बांगलादेशात परतणार आहे. मला कशाचीही भीती नाही. मला माहीत आहे की ते मला ठार मारू शकतात, अटक करू शकतात आणि माझा छळ करू शकतात. मात्र, मायदेशात परतणे ही माझी जबाबदारी आहे.”यापूर्वीही तुरुंगवास आणि छळाचा सामना केला असल्याची आठवण त्यांनी करून दिली. त्यामुळे यावेळीही माघार घेण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सर्व धोके माहीत असूनही बांगलादेशात परतण्याच्या निर्णयावर आपण ठाम असल्याचे त्यांनी पुन्हा एकदा सांगितले.

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे आभार मानले. अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय विकास संस्थेची (यूएसएआयडी) आर्थिक मदत रोखल्यामुळे हा निधी चुकीच्या लोकांच्या हातात जाण्यापासून वाचेल, असे त्या म्हणाल्या.बांगलादेशातील तारिक रहमान यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप करताना त्यांनी देशातील बेरोजगारी, महिलांवरील गैरवर्तन आणि खंडणीखोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचा दावा केला. विद्यमान सरकार पूर्णपणे भ्रष्ट असल्याचा आरोपही त्यांनी केला. तसेच बांगलादेशात निष्पक्ष आणि स्वतंत्र निवडणुका घेण्याची मागणी केली.

शेख हसीना म्हणाल्या की, मृत्यू आला तरी आपल्या जन्मभूमीतच अखेरचा श्वास घ्यायचा आहे. त्या भूमीशी आपल्या आई-वडिलांच्या आठवणी जोडलेल्या आहेत. बांगलादेशात परतण्याचा आणि अवामी लीगने निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्याचा उद्देश सत्ताप्राप्ती नसून देशात विकास, धर्मनिरपेक्षता आणि स्थैर्य पुन्हा प्रस्थापित करणे हा आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने २०२४ मधील विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचाराच्या आणि मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांच्या प्रकरणात नोव्हेंबर २०२५ मध्ये शेख हसीना यांना त्यांच्या अनुपस्थितीत फाशीची शिक्षा सुनावली होती. मात्र, शेख हसीना यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. ही संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

बांगलादेशातील मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील तत्कालीन अंतरिम सरकारने आणि त्यानंतर तारिक रहमान यांच्या नेतृत्वाखालील नव्या सरकारनेही शेख हसीना यांच्या प्रत्यार्पणाची मागणी भारताकडे केली आहे. दरम्यान, भारत सरकारने या प्रत्यार्पणाच्या मागणीचा न्यायिक आणि देशांतर्गत कायदेशीर प्रक्रियांच्या माध्यमातून आढावा घेतला जात असल्याचे स्पष्ट केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande