
मुंबई, 20 ऑक्टोबर (हिं.स.)। कपाळावर लाल चंद्रकोर… डोळ्यांत एक वेगळीच चमक... आणि अशी नजर, जणू तिला काहीतरी सांगायचंय ! रिंकू राजगुरूच्या या नजरेमागची गोष्ट नेमकी काय, असा प्रश्न उपस्थित करणारं ‘जिजाई’ या आगामी मराठी चित्रपटाचं नवं पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. पोस्टरमध्ये रिंकूचे डोळेच जणू या कथेची पहिली झलक देत आहेत. झी स्टुडिओज प्रस्तुत या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर झाली असून येत्या २० नोव्हेंबर रोजी ‘जिजाई’ चित्रपटगृहांत दाखल होणार आहे.
पोस्टरमध्ये रिंकूचा संपूर्ण चेहरा न दाखवता तिचे डोळे आणि कपाळावरील लाल चंद्रकोर यांवर लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे. तिच्या डोळ्यांतील बोलकेपणा, चेहऱ्यावर पडणारा प्रकाश यामुळे पोस्टरला एक वेगळीच दृश्यात्मक ताकद मिळाली आहे. सोनेरी अक्षरांतील ‘जिजाई’ हे शीर्षकही लक्ष वेधून घेतं. या पोस्टरमधून चित्रपटाच्या कथेची झलक मिळत असली तरी रिंकूची व्यक्तिरेखा नेमकी कोणती, तिच्या कपाळावरील चंद्रकोरीचं महत्त्व काय आणि तिच्या नजरेतून कोणती गोष्ट सांगितली जाणार, हे प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत.
दिग्दर्शक तृशांत इंगळे यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून झी स्टुडिओजने या चित्रपटाची निर्मिती तर कोकोनट फिल्म्सने सहनिर्मिती केली आहे.
दिग्दर्शक तृशांत इंगळे म्हणतात, “प्रत्येक व्यक्तिरेखेला स्वतःची एक गोष्ट असते आणि ती गोष्ट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याची ताकद चित्रपटाच्या मांडणीत असते. ‘जिजाई’च्या बाबतीतही आम्ही काहीतरी वेगळं मांडण्याचा प्रयत्न केला आहे. मुळात हा चित्रपट आजच्या स्त्रीचा आहे. जी लढवय्या आहे. पोस्टरमधून प्रेक्षकांना कथेची उत्सुकता वाटावी आणि त्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण व्हावेत, अशी आमची इच्छा होती. रिंकूने या भूमिकेला दिलेला न्याय आणि चित्रपटातील तिचं रूप प्रेक्षकांसाठी नक्कीच खास असेल.”
झी स्टुडिओजचे मराठी व्यवसाय प्रमुख बवेश जानवलेकर म्हणतात, “झी स्टुडिओज नेहमीच वेगळ्या आशयाच्या आणि प्रेक्षकांना नव्या अनुभवाची ओळख करून देणाऱ्या चित्रपटांना प्राधान्य देत आलं आहे. ‘जिजाई’ हा त्याच प्रवासातील एक महत्त्वाचा चित्रपट आहे. रिंकू राजगुरूसारखी गुणी अभिनेत्री आणि नवोदित दिग्दर्शक तृशांत इंगळे यांच्यासोबत काम करताना आम्हाला आनंद होत आहे. या चित्रपटाच्या पोस्टरमुळे प्रेक्षकांमध्ये निर्माण झालेली उत्सुकता चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर आणखी वाढेल, असा आम्हाला विश्वास आहे.”
नुपूर गुहा, तुषार राऊत सहनिर्मित या चित्रपटात रिंकू राजगुरूसह आणखी कोणते चेहरे झळकणार याचीही उत्सुकता लागली आहे. दरम्यान, ‘जिजाई’च्या या पहिल्या पोस्टरने प्रेक्षकांच्या मनात प्रश्नांची मालिका नक्कीच सुरू केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर