जळगावच्या सराफ बाजारात सोन्याचे दर घसरले
अवघ्या १० दिवसांत तोळ्यामागे ६ हजारांची घट जळगाव, २१ ऑक्टोबर (हिं.स.) : दसरा सण पार पडल्यानंतर आता दिवाळीच्या खरेदीची लगबग सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर सोने-चांदी खरेदीचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी आहे. जळगावच्या सराफ बाजारात
सोने-चांदी लोगो


अवघ्या १० दिवसांत तोळ्यामागे ६ हजारांची घट

जळगाव, २१ ऑक्टोबर (हिं.स.) : दसरा सण पार पडल्यानंतर आता दिवाळीच्या खरेदीची लगबग सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर सोने-चांदी खरेदीचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी आहे. जळगावच्या सराफ बाजारात गेल्या १० दिवसांत सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली असून, प्रति तोळा सुमारे ६ हजार रुपयांनी भाव कमी झाले आहेत. सध्या जळगावमध्ये १० ग्रॅम सोन्याचा दर १ लाख ४४ हजार ७०० रुपये आहे.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत सोने आणि दागिन्यांच्या खरेदीत वाढ होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत सोन्याच्या दरातील घसरणीमुळे ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे दागिने खरेदी करण्याची योजना आखणारे ग्राहक सोन्याच्या ताज्या दरांवर लक्ष ठेवून आहेत.

जागतिक घडामोडींचा सोन्याच्या दरांवर परिणाम

आंतरराष्ट्रीय बाजारातील आर्थिक घडामोडींचा सोन्याच्या किमतींवर परिणाम होत असतो. भारतीय रुपयाच्या मूल्यामधील बदल, अमेरिकेच्या सरकारी रोख्यांवरील परतावा आणि व्याजदरांबाबतच्या अपेक्षा ही सोन्याच्या दरांवर प्रभाव टाकणारी महत्त्वाची कारणे आहेत. याशिवाय कच्च्या तेलाच्या किमती, महागाई आणि अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हचे व्याजदरविषयक धोरण यांचाही सोन्याच्या बाजारावर परिणाम होतो.

जागतिक स्तरावरील युद्धजन्य परिस्थिती आणि भू-राजकीय तणावामुळे गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून सोन्याकडे वळू शकतात. त्यामुळे सोन्याच्या किमतींना आधार मिळण्याची शक्यता असते. दुसरीकडे, व्याजदर आणि रोख्यांवरील परतावा वाढल्यास सोन्याच्या दरांवर दबाव येऊ शकतो. त्यामुळे आगामी काळात सोन्याचे दर कोणत्या दिशेने जातील, हे जागतिक आर्थिक परिस्थितीवर अवलंबून राहणार आहे.

खरेदीपूर्वी ताजे दर तपासण्याचे आवाहन

जळगावमध्ये सध्या १० ग्रॅम सोन्याचा दर १ लाख ४४ हजार ७०० रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, प्रत्यक्ष खरेदी करताना सोन्याची शुद्धता, वस्तूवरील जीएसटी, घडणावळ आणि दागिन्यांच्या प्रकारानुसार अंतिम किंमत बदलू शकते. सोन्याचे दर दररोज बदलत असल्याने ग्राहकांनी खरेदी करण्यापूर्वी स्थानिक सराफाकडून ताजे दर तपासून घ्यावेत.

-------------------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande