
जळगाव , 21 ऑक्टोबर (हिं.स.) | दसऱ्याच्या मध्यरात्री जळगाव शहरातील जुन्या बसस्थानक परिसरात एका ३५ वर्षीय तरुणीवर गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. दुचाकीवरून मित्रासोबत जात असलेल्या तरुणीचा पाठलाग करून हल्लेखोरांनी तिच्यावर गोळी झाडल्याचा प्राथमिक वृत्तांत आहे. या घटनेत तरुणीच्या डाव्या पायाला गोळी लागली असून, तिला उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दसऱ्याच्या रात्री सुमारे १२.३० वाजता तरुणी आपल्या मित्रासोबत दुचाकीवरून प्रवास करत होती. त्याचवेळी काही जणांनी दुचाकीवरून त्यांचा पाठलाग केला. जुन्या बसस्थानक परिसरात त्यांना गाठल्यानंतर गोळीबार करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या हल्ल्यात तरुणीच्या डाव्या पायाला गोळी लागली. जखमी अवस्थेत तिला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आले. तेथे तिच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती आहे.
प्राथमिक वृत्तानुसार, तरुणीच्या पतीचे सुमारे १२ वर्षांपूर्वी निधन झाले आहे. ती आपल्या दोन मुलांसह जळगावातील गोपाळपुरा परिसरात राहते. गेल्या चार वर्षांपासून तिचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याचे सांगितले जात आहे. या संबंधांना तरुणाच्या कुटुंबीयांचा विरोध होता, विशेषतः त्याच्या भावाचा याबाबत आक्षेप असल्याची माहिती समोर आली आहे. या वादातूनच गोळीबार झाल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, हल्ल्यामागील नेमके कारण पोलिस तपासातून स्पष्ट होणार आहे.या घटनेप्रकरणी अनिकेत मधुकर सपकाळे आणि त्याच्या साथीदारांची नावे समोर आल्याचे वृत्त आहे.
जळगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. हल्लेखोरांचा शोध, गोळीबारासाठी वापरलेले शस्त्र आणि घटनेमागील कारण याबाबत अधिकृत तपासातून माहिती समोर येणे अपेक्षित आहे. दसऱ्याच्या रात्री घडलेल्या या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर