नाशिक - शहरात जिवे ठार मारण्याच्या तीन घटना; आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल
नाशिक, 21 ऑक्टोबर, (हिं.स.)। शहर परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी धारदार कोयत्याने वार करुन तीन जणांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याच्या घटना घडल्या असून, वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये नोंदी करण्यात आल्या आहेत. प्राणघातक हल्ल्याचा पहिला प्रयत
नाशिक - शहरात जिवे ठार मारण्याच्या तीन घटना; आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल


नाशिक, 21 ऑक्टोबर, (हिं.स.)। शहर परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी धारदार कोयत्याने वार करुन तीन जणांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याच्या घटना घडल्या असून, वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये नोंदी करण्यात आल्या आहेत.

प्राणघातक हल्ल्याचा पहिला प्रयत्न प्रबुद्धनगर येथे घडला. फिर्यादी वैभव पुंजाराम साबळे (रा. श्रमिकनगर, सातपूर) हे १९ ऑक्टोबर रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास प्रबुद्धनगर येथे आंबेडकर चौकात गरबा नृत्याचा कार्यक्रम बघत होते. त्यावेळी आरोपी बाळा अशोक पटेकर, पुष्पराज घुगे, सार्थक गोवर्धन व त्यांचे इतर तीन साथीदार तेथे आले. त्यांनी सर्वांनी जुन्या भांडणाची कुरापत काढून साबळे यांना मारहाण केली. तुला खूप माज आला आहे, आज तुझा गेम करतो, असे म्हणून सार्थक गोवर्धन याने धारदार तलवारीने फिर्यादीच्या डोक्यावर वार केले. पुष्पराज घुगे याने त्याच्या हातातील धारदार कोयत्याने डोक्याच्या उजव्या बाजूस मारले. त्यांच्या इतर साथीदारांनी हातातील लाकडी दांडक्याने फिर्यादीला मारुन जिवे ठार करण्याचा प्रयत्न केला.याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पवार करीत आहे.

प्राणघातक हल्ल्याचा दुसरा प्रकार सिडकोत घडला. फिर्यादी कैलास विष्णू टिळे (रा. सूर्यनारायण चौक, पवननगर) यांचा भाचा भूषण विलास एखंडे हा सावतानगर बसस्टॉपजवळ उभा असताना आरोपी रितेश मराठे (रा. पवननगर, सिडको) व त्याचे दोन साथीदार हे भूषणजवळ आले. त्यांनी भूषणकडे पैशांची मागणी करून भांडणाची कुरापत काढली. रितेशने भूषणच्या हातातील मोबाईल बळजबरीने हिसकावून त्याला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच तुला आज जिवंत ठेवणार नाही, अशी दमदाटी करून जिवे वार मारण्याच्या उद्देशाने रितेश याने हातातील चॉपरने भूषणच्या पोटात खुपसून दुखापत करुन पळून गेला. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात तिघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नवगिरे करीत आहे.

प्राणघातक हल्ल्याचा तिसरा प्रकार सातपूर येथे घडला. सातपूर येथील आंबेडकर चौकात नवरात्रोत्सवानिमित्त दांडियाचा कार्यक्रम सुरू होता. या कार्यक्रमात शितल डोळसे, कोमल डोळसे व सोनल डोळसे या वेड्यावाकड्या नाचत होत्या. या कारणावरुन त्यांना हटकल्याचा राग आल्याने त्यांनी कुरापत काढून फिर्यादी प्रतिभा नाना पानपाटील (रा. पिंपळ चौक, प्रबुद्धनगर, सातपूर) यांचा मुलगा शुभम नाना पानपाटील (वय २८) हा मनमाड येथून रात्री दसऱ्यानिमित्त त्याच्या मुलींना भेटण्यासाठी आला होता. तो प्रबुद्धनगर येथून राहत्या घरी येत असताना आरोपी रवि पारवे, वैभव साबळे, रोहित मोरे, तुषार डोळसे, सुनिता डोळसे, उषा नाईक, सोनल डोळसे, शितल डोळसे, कोमल डोळसे, सोनू गांगुर्डे व त्यांच्यासोबतचे चार ते पाच अनोळखी इसम यांनी फिर्यादीच्या मुलाला रस्त्यात अडवून त्याला तलवार, कोयता, लोखंडी रॉड व लाठ्या काठ्यांनी मारहाण करुन डोक्यास गंभीर दुखापत करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार १९ ऑक्टोबर रोजी रात्री १० ते ११ वाजेच्या सुमारास प्रबुद्धनगर येथे आंबेडकर चौकात घडला. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात १० ते १५ जणांच्या टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बोडके करीत आहे

---------------

हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI


 rajesh pande