
नवी दिल्ली, 21 ऑक्टोबर (हिं.स.) । मुंबईने रणजी ट्रॉफीत सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. हिमाचल प्रदेशविरुद्धचा सामना मुंबईने एक डाव आणि ९७ धावांनी जिंकला. २०२४ पासून भारताच्या कसोटी संघात पुनरागमनाची प्रतीक्षा पाहणारा सर्फराज खान या सामन्यात चमकला. त्याने २२८ चेंडूंत १९ चौकारांसह १५४ धावांची खेळी केली.
हिमाचल प्रदेशने रणजी ट्रॉफीच्या 'ग्रुप डी'मधील हा सामना शेवटच्या दिवशी दुसऱ्या सत्रापर्यंत खेचला. मात्र, अखेरीस मुंबईने लुहनू क्रिकेट मैदानावर यजमान हिमाचल प्रदेशचा एका डावाने आणि ९७ धावांनी पराभव करत सलग दुसऱ्यांदा 'बोनस पॉइंट'सह विजय मिळवला.
३८८ धावांनी पिछाडीवर असलेल्या हिमाचल प्रदेशला सामन्यात परतण्यासाठी एका विशेष कामगिरीची गरज होती. कर्णधार पुखराज मान (५० धावा, १२६ चेंडू, ६ चौकार) आणि वैभव कल्टा (६३ धावा, १६९ चेंडू, १० चौकार) यांनी अर्धशतके झळकावून झुंजार वृत्ती दाखवली. पण, मुंबईच्या अनुभवी गोलंदाजांनी हिमाचलचा डाव २९१ धावांवर संपुष्टात आणला.
खेळपट्टीकडून फारशी मदत मिळत नसल्यामुळे, मुंबईच्या गोलंदाजांना विकेट्स मिळवण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागले. मोहित अवस्थीने ४४ धावांत ५ बळी घेत मोलाची भूमिका बजावली, तर डावखुरा फिरकी गोलंदाज शम्स मुलानीने महत्त्वाच्या क्षणी बळी मिळवून हिमाचलला मोठी भागीदारी करण्यापासून रोखले.
तिसऱ्या दिवशीच्या १४४ धावांच्या धावसंख्येवरून पुढे खेळताना, मान आणि कल्टा यांनी हार मानली नाही. या जोडीने चौथ्या विकेटसाठी ८५ धावांची भागीदारी केली आणि आपापली अर्धशतके पूर्ण केली, ज्यामुळे मुंबईला विजयासाठी अधिक संघर्ष करावा लागला. अखेर तुषार देशपांडेने मानला बाद करून ही भागीदारी तोडली आणि मुंबईला हवी असलेली संधी मिळवून दिली.
वाढत्या दबावाखालीही कल्टा विचलित झाला नाही. त्याने संयम आणि जिद्द दाखवत सामना लांबवला, पण शेवटी अवस्थीने त्याला बाद केले. त्याच्या या झुंजार खेळीमुळे सामना दुपारच्या सत्रापर्यंत पोहोचला, तरीही मुंबईच्या गोलंदाजांनी कडक उन्हातही शिस्तबद्ध गोलंदाजी करत सामन्यावर आपली पकड ढिली होऊ दिली नाही.
हिमाचल प्रदेशने दुसऱ्या डावात थोडाफर प्रतिकार केला. पण ३८८ धावांची मोठी आघाडी ओलांडणे त्यांच्यासाठी अशक्य ठरले. अवस्थीने अचूक टप्प्यावर सातत्याने गोलंदाजी केली, तर मुंबईच्या इतर गोलंदाजांनी संयमाने उर्वरित बळी मिळवले. खेळपट्टीकडून कोणतीही मदत मिळत नसतानाही, मुंबईने सलग दुसऱ्यांदा 'बोनस पॉइंट'सह विजय मिळवत सात गुण आपल्या खात्यात जमा केले. दुसरीकडे, यजमान हिमाचल प्रदेशला सलग दुसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला असून, ते 'ग्रुप डी' गुणतालिकेत तळाला आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे