
रत्नागिरी, 21 ऑक्टोबर (हिं.स.) । रत्नागिरी जिल्हा बुद्धिबळ विकास कार्यक्रमांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या रत्नागिरी तालुकास्तरीय क्लासिकल बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद सोहम रुमडे याने प्राप्त केले.
सोहमने अत्यंत अटीतटीच्या अंतिम फेरीत प्रथम मानांकित सौरीश कशेळकरविरुद्धचा डाव बरोबरीत सोडवला. आयुष रायकरने श्रीहास नारकर विरुद्धच्या डावात बाजी मारली तर साहस नारकरने बालबुद्धिबळपटू विहंग सावंतविरुद्धचा सामना जिंकला.
सोहम, साहस, सौरीश व आयुष सर्वांचे समान पाच गुण झाले. टाय ब्रेक गुणांवर सोहम विजेता तर साहस उपविजेता ठरला. सौरीश व आयुष यांना अनुक्रमे तिसऱ्या व चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. यश गोगटे पाचवा, विहंग सावंत सहावा व श्रीहास नारकर सातवा आला.
उत्तेजनार्थ पारितोषिके अशी - अनरेटेड प्रथम : ओम तेरसे, महिला प्रथम : मृण्मयी दांडेकर, १५ वर्षे वयोगट : नंदन दामले, १३ वर्षे वयोगट : अलिक गांगुली, ११ वर्षे वयोगट : शर्वील शहाणे, ०९ वर्षे वयोगट : आरव निमकर, विशेष कामगिरी : सिद्धेश मदने.
स्पर्धेतील पारितोषिक प्राप्त खेळाडूंना एकूण पंधरा हजार रुपयांची बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. कै. उज्ज्वला भिडे यांचे कुटुंबीय सौरभ भिडे, विक्रम फडके यांनी ही स्पर्धा भरविण्यात मोलाचे सहकार्य केले. पारितोषिक वितरण समारंभ चार्टर्ड अकाउंटंट आदित्य फडके यांच्या हस्ते पार पडला.
यावेळी विजय भिडे, चैतन्य भिडे, जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सचिव विवेक सोहनी आदी मान्यवर उपस्थित होते. रत्नागिरीसारख्या ठिकाणी क्लासिकल स्पर्धा भरविल्या जात असल्याबद्दल फडके यांनी आयोजकांचे कौतुक केले. मॅजिक स्क्वेअर चेस अॅकॅडमीमार्फत भविष्यातदेखील अशा इतरही स्पर्धा भरविण्यात येतील अशी ग्वाही देण्यात आली.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी