अरुणाचल प्रदेश : जलविद्युत प्रकल्पाविरोधातील आंदोलनाला हिंसक वळण
सियांग अपर मल्टिपर्पज प्रकल्पाला विरोध पोलीसांशी झटापटीत 4 महिला आंदोलक जखमी इटानगर, 23 ऑक्टोबर (हिं.स.) : अरुणाचल प्रदेशातील प्रस्तावित ‘सियांग अपर मल्टिपर्पज प्रकल्पा’विरोधात पुकारण्यात आलेल्या बंददरम्यान पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली.
अरुणाचल प्रदेशातील आंदोलनाचे छायाचित्र


सियांग अपर मल्टिपर्पज प्रकल्पाला विरोध

पोलीसांशी झटापटीत 4 महिला आंदोलक जखमी

इटानगर, 23 ऑक्टोबर (हिं.स.) : अरुणाचल प्रदेशातील प्रस्तावित ‘सियांग अपर मल्टिपर्पज प्रकल्पा’विरोधात पुकारण्यात आलेल्या बंददरम्यान पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली. सियांग जिल्ह्यातील गेकूजवळ असलेल्या डाइट-डाइम परिसरात ही घटना घडली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. या घटनेत 4 महिला जखमी झाल्या असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

प्रस्तावित 11,200 मेगावॅट क्षमतेच्या जलविद्युत प्रकल्पाला विरोध करण्यासाठी विविध संघटनांनी 12 तासांच्या बंदची हाक दिली होती. या बंददरम्यान सुमारे 150 ते 200 आंदोलक डाइट-डाइम परिसरात जमले होते. आंदोलकांकडे धारदार शस्त्रे, लाठ्या आणि गोफणी असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. सियांगचे पोलीस अधीक्षक कामदम सिखोम यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपर सियांग जिल्ह्यातील गेकू आणि कोमकार परिसरातून आलेले आंदोलक सकाळी सुमारे सात वाजता डाइट-डाइम येथे एकत्र जमले. यावेळी त्यांनी पोलिसांचे बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न केला. तसेच पोलिसांच्या वाहनांची तोडफोड करण्याचा प्रयत्न करून सुरक्षारक्षकांवर दगडफेक केल्याचा आरोप आहे.परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला. कार्यकारी दंडाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संबंधित आंदोलकांविरोधात कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आल्याचे पोलीस अधीक्षकांनी सांगितले.दरम्यान, आंदोलकांनी केलेल्या दाव्यानुसार, त्यांच्यापैकी अनेक जण अश्रुधुराच्या संपर्कात आल्याने त्यांना श्वास घेण्यास त्रास झाला.

दोन जिल्ह्यांसह परिसरातील जनजीवनावर परिणाम

बंदमुळे सियांग आणि अपर सियांग जिल्ह्यांसह ईस्ट सियांग जिल्ह्यातील काही भागांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले. दुकाने आणि व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद राहिली, तर नागरिकांनी बहुतांश वेळ घरातच राहणे पसंत केले. सियांग जिल्ह्यातील इतर भागांत बंद शांततेत सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

‘आदि बाने केबांग युनायटेड’, ‘एसयूएमपी अफेक्टेड एरिया यूथ असोसिएशन’, ‘सियांग इंडिजिनस फार्मर्स फोरम यूथ विंग’ आणि ‘आदि गॅलो वेल्फेअर सोसायटी’ या संघटनांनी संयुक्तपणे बंदचे आयोजन केले होते.

आंदोलकांच्या 4 प्रमुख मागण्या

या आंदोलनामागे विविध मागण्या असून, त्यामध्ये पुढील मुद्द्यांचा समावेश आहे :

अटक करण्यात आलेल्या 10 कार्यकर्त्यांची सुटका करावी.

निलंबित करण्यात आलेल्या गावबुरांच्या (गावप्रमुखांच्या) नियुक्त्या पुन्हा बहाल कराव्यात. प्रस्तावित प्रकल्पाशी संबंधित सर्व प्राथमिक हालचाली मागे घ्याव्यात.

परिसरात तैनात असलेले निमलष्करी आणि केंद्रीय सुरक्षा दल हटवावेत.

चीनच्या प्रस्तावित धरणाच्या पार्श्वभूमीवर प्रकल्पाचे महत्त्व

अरुणाचल प्रदेश सरकारच्या म्हणण्यानुसार, प्रस्तावित सियांग अपर मल्टिपर्पज प्रकल्पाचा मुख्य उद्देश सियांग नदीच्या खोऱ्यात पाण्याचा साठा आणि व्यवस्थापन करणे हा आहे. चीनकडून सियांग नदीच्या वरच्या प्रवाहात प्रस्तावित करण्यात आलेल्या मोठ्या धरणाच्या पार्श्वभूमीवर भारताच्या बाजूने पाणीसाठा आणि नदी व्यवस्थापनाची क्षमता वाढवण्याच्या दृष्टीने या प्रकल्पाकडे पाहिले जात आहे.मात्र, या प्रकल्पाला स्थानिक संघटनांकडून विरोध होत आहे. प्रकल्पाच्या अंमलबजावणीसंदर्भातील प्राथमिक हालचाली, स्थानिक समुदायांच्या मागण्या आणि सुरक्षा दलांच्या तैनातीवरून परिसरात तणाव निर्माण झाला आहे.

------------------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande