
नवी दिल्ली , 23 ऑक्टोबर (हिं.स.)।सौदी अरेबियातील दम्माम येथील किंग फहद आंतरराष्ट्रीय विमानतळावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर तेथील सुरक्षा परिस्थिती लक्षात घेऊन इंडिगोने रियाधला जाणारी आणि रियाधहून येणारी आपली विमानसेवा ३१ ऑक्टोबरपर्यंत रद्द केली आहे. तर जेद्दा, दम्माम आणि मदिना येथील विमानसेवा २७ ऑक्टोबरपर्यंत स्थगित ठेवण्यात येणार आहे.
एक्स या समाजमाध्यमावर जारी केलेल्या प्रवासविषयक सूचनेत विमान कंपनीने सांगितले की, सध्याच्या सुरक्षा परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.विमान कंपनीने म्हटले आहे, “प्रवासविषयक सूचना : बदलत्या सुरक्षा परिस्थितीचा विचार करून आणि काळजीपूर्वक आढावा घेतल्यानंतर इंडिगोची रियाधला जाणारी आणि रियाधहून येणारी विमानसेवा ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत (या तारखेसह) रद्द राहील. तर जेद्दा, दम्माम आणि मदिना येथे जाणारी तसेच तेथून येणारी विमानसेवा २७ ऑक्टोबर २०२६ पर्यंत (या तारखेसह) रद्द राहील.”
इंडिगोने सांगितले की, कंपनी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. तसेच परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांशी समन्वय साधला जात आहे. “आमच्या प्रवाशांची आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षा व कल्याण हे आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे,” असेही कंपनीने स्पष्ट केले.
विमानसेवा रद्द झाल्यामुळे प्रभावित झालेल्या प्रवाशांना तिकीट आरक्षित करताना दिलेल्या संपर्क तपशिलांद्वारे माहिती दिली जात आहे. प्रवाशांनी विमानतळाकडे रवाना होण्यापूर्वी इंडिगोच्या अधिकृत संकेतस्थळावर आपल्या विमानाच्या उड्डाणाची सद्यस्थिती तपासून घ्यावी, असा सल्लाही कंपनीने दिला आहे.
विमानसेवा रद्द झाल्यामुळे झालेल्या गैरसोयीबद्दल कंपनीने दिलगिरी व्यक्त केली आहे.सुरक्षेबाबत चिंता वाढत असतानाच ही घोषणा करण्यात आली आहे.सौदी अरेबियाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी संध्याकाळी दम्माम येथील किंग फहद आंतरराष्ट्रीय विमानतळावर झालेल्या हल्ल्यात एका भारतीय नागरिकासह दोन जणांचा मृत्यू झाला, तर अन्य आठ जण जखमी झाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode