मोना अग्रवालने पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेत दुसरे सुवर्णपदक जिंकले
आइची-नागोया, 23 ऑक्टोबर (हिं.स.)। भारताची पॅरा नेमबाज मोना अग्रवालने पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धा-२०२६ मध्ये शुक्रवारी दुसरे सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. भारताची आणखी एक नेमबाज अवनी लेखरा चौथ्या स्थानावर राहिली. महिलांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशन
Sports APG2026 Shooting Mona Gold World Record


आइची-नागोया, 23 ऑक्टोबर (हिं.स.)। भारताची पॅरा नेमबाज मोना अग्रवालने पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धा-२०२६ मध्ये शुक्रवारी दुसरे सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. भारताची आणखी एक नेमबाज अवनी लेखरा चौथ्या स्थानावर राहिली.

महिलांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशन्स एसएच-१ प्रकाराच्या अंतिम फेरीत मोनाने ३५७.५ गुण मिळवत विश्वविक्रमाची नोंद केली. चीनच्या झांग कुइपिंगने ३५३.७ गुणांसह दुसरे स्थान मिळवत रौप्यपदक जिंकले. दक्षिण कोरियाच्या किम मियॉन्गने ३४४.४ गुणांसह कांस्यपदक पटकावले.

सुवर्णपदक जिंकताना मोनाने चीनच्या झांग कुइपिंगवर ३.८ गुणांची आघाडी घेतली. यापूर्वी स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी तिने महिलांच्या १० मीटर एअर रायफल स्टँडिंग एसएच-१ प्रकारातही सुवर्णपदक जिंकले होते. त्या स्पर्धेत मोनाने २५० गुण मिळवत आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेचा विक्रम प्रस्थापित केला होता. यासह तिने २०२३ मध्ये हांगझोऊ येथे अवनी लेखराने नोंदवलेला २४९.६ गुणांचा विक्रम मागे टाकला होता.

या प्रकाराच्या अंतिम फेरीत सहभागी झालेली दुसरी भारतीय नेमबाज अवनी लेखरा चौथ्या स्थानावर राहिली. प्रोन पोझिशननंतर ती पहिल्या दोन खेळाडूंमध्ये होती; मात्र स्टँडिंग सिरीजमध्ये पिछाडीवर पडल्याने तिला पदकाने हुलकावणी दिली. मोनाच्या या कामगिरीमुळे पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारताच्या पदक मोहिमेला बळ मिळाले आहे. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी १० मीटर एअर रायफल स्टँडिंग एसएच-१ प्रकारात मोना आणि अवनी यांनी अनुक्रमे पहिले आणि दुसरे स्थान मिळवत भारताला दुहेरी यश मिळवून दिले होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande