
अनाहत पहिल्यांदाच पीएसए गोल्ड-स्तरीय उपांत्य फेरीत पोहोचली
रेडवुड सिटी, 23 ऑक्टोबर (हिं.स.)। भारताची युवा स्क्वॅशपटू अनाहत सिंहने शानदार पुनरागमन करत सिलिकॉन व्हॅली ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत इजिप्तची सहावे मानांकन असलेली सलमा हानी हिचा पराभव केला. यासह तिने पहिल्यांदाच पीएसए गोल्ड स्तरावरील स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. जागतिक क्रमवारीत १५व्या स्थानावर असलेल्या १८ वर्षीय अनाहतने ४२ मिनिटे चाललेल्या सामन्यात जागतिक क्रमवारीत १४व्या स्थानावर असलेल्या हानीचा ४-११, ११-८, ४-११, ११-२, ११-५ असा पराभव केला.
सामन्यात अनाहत १-२ अशी पिछाडीवर होती. मात्र, तिने शानदार पुनरागमन करत सलग दोन गेम जिंकून सामना आपल्या नावावर केला. याच्या एक दिवस आधी तिने इजिप्तची जागतिक क्रमवारीतील तिसऱ्या क्रमांकाची खेळाडू आणि आठ वेळा विश्वविजेती ठरलेली नूर एलशेरबिनी हिचा सरळ गेममध्ये पराभव करून मोठा उलटफेर केला होता.
सामन्यानंतर अनाहतने सांगितले की, तिने यापूर्वी कधीही हानीविरुद्ध सामना खेळला नव्हता. त्यामुळे कोर्टवर उतरण्यापूर्वी सामना कसा होईल, याचा तिला अंदाज नव्हता. हानी ही पीएसए टूरमधील अनुभवी खेळाडू असून, तिला अनेकदा खेळताना पाहिले असल्याचे अनाहतने सांगितले. एलशेरबिनीविरुद्धच्या विजयानंतर तिचा आत्मविश्वास वाढला. चांगला खेळ केल्यास आपण कोणत्याही खेळाडूला आव्हान देऊ शकतो, असे तिला वाटू लागले.
अनाहत म्हणाली की, आदल्या दिवशी मिळालेल्या विजयामुळे ती भावनिकदृष्ट्या थोडी थकली होती. मात्र, स्पर्धेत मिळालेली आघाडी आणि लय तिला गमवायची नव्हती. तिने सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न केला आणि पुढील फेरीत प्रवेश मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला.
उपांत्य फेरीत अनाहतचा सामना मलेशियाची जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर असलेली आणि विद्यमान आशियाई क्रीडा स्पर्धेची विजेती शिवसांगरी सुब्रमण्यम हिच्याशी होणार आहे. शिवसांगरीने आशियाई क्रीडा स्पर्धेच्या महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात अनाहतचा पराभव केला होता. लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये प्रथमच स्क्वॅशचा समावेश होणार आहे.
अनाहतने २०२३ मध्ये हांगझोऊ येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत महिला सांघिक आणि मिश्र दुहेरी प्रकारांत दोन कांस्यपदके जिंकली होती. त्यानंतर २०२६ मधील आयची-नागोया आशियाई क्रीडा स्पर्धेत महिला एकेरीचे रौप्यपदक जिंकून आशियाई क्रीडा स्पर्धेतील स्क्वॅशच्या एकेरीच्या अंतिम फेरीत पोहोचणारी ती पहिली भारतीय महिला ठरली. याच वर्षी तिने जागतिक ज्युनियर स्क्वॅश अजिंक्यपद स्पर्धेत मुलींच्या एकेरीचे विजेतेपद पटकावले. अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरली. यासह तिने या स्पर्धेतील इजिप्तचे १५ वर्षांचे वर्चस्व संपुष्टात आणले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule