मुंबईत जैश-ए-मोहम्मदशी संबंधित एकाला एटीएसने घेतले ताब्यात
प्रक्षोभक पोस्ट, मसूद अझहरच्या ऑडिओ क्लिप्स आढळल्या; गुन्हा दाखल मुंबई, २४ ऑक्टोबर (हिं.स.) : मुंबई एटीएसने माहीम येथून मोहम्मद हसन अबू सरमद अख्तर (३३) याला ''जैश-ए-मोहम्मद'' (JeM) या संघटनेशी संबंध असल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. त्याच्या म
मुंबई एटीएस


* प्रक्षोभक पोस्ट, मसूद अझहरच्या ऑडिओ क्लिप्स आढळल्या; गुन्हा दाखल

मुंबई, २४ ऑक्टोबर (हिं.स.) : मुंबई एटीएसने माहीम येथून मोहम्मद हसन अबू सरमद अख्तर (३३) याला 'जैश-ए-मोहम्मद' (JeM) या संघटनेशी संबंध असल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. त्याच्या मोबाईल फोनची तपासणी केली असता, त्यात प्रक्षोभक पोस्ट आणि मसूद अझहरच्या ऑडिओ क्लिप्स आढळून आल्या आहेत. तो पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेच्या हस्तकांशी संपर्कात होता का, याचाही तपास सुरू आहे; ही बाब त्याच्या सोशल मीडियावरील हालचाली आणि एका टेलिग्राम ग्रुपच्या माध्यमातून समोर आली.

एटीएसच्या काळाचौकी पथकाने आरोपी विरुद्ध 'भारतीय न्याय संहिता' (BNS) च्या कलम १९६(१) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. हे कलम धर्म, भाषा किंवा इतर कारणांवरून विविध गटांमध्ये शत्रुत्वाला प्रोत्साहन देणे आणि सामाजिक सलोखा बिघडवण्याशी संबंधित आहे. आरोपी हा इत्र विक्री करत असल्याचे आणि बाईक रायडर असल्याची माहितीही समोर येत आहे.

पाकिस्तानची दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या अजहर मसूद याच्या ऑडिओ क्लिपही त्याच्या मोबाईलमध्ये आढळल्या आहेत. या कारवाईमुळे मुंबईत खळबळ उडाली आहे. मोहम्मद हसन याच्याकडून आता पुढील चौकशीत तपास यंत्रणांच्या हाती महत्त्वाची माहिती येण्याची शक्यता आहे.

अधिक माहितीनुसार, एटीएसने माहिम मेट्रो स्टेशनजवळील लक्ष्मी बिल्डिंग परिसरातून मोहम्मद हसन अबू सरमद अख्तरला अटक केली आहे. आरोपीच्या मोबाईलमध्ये प्रक्षोभक पोस्ट आणि जिहादचे समर्थन करणारे संदेश आढळल्याचा दावा आहे. सोशल मीडिया पोस्टमधून मुस्लिमांना शस्त्र उचलण्यास प्रवृत्त केल्याचाही संशय आरोपीवर आहे. आरोपी टेलिग्राम ग्रुप चालवत होता, त्यावर जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अजहरच्या भाषणांचे ऑडिओ अपलोड केल्याची माहिती समोर येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यादरम्यान सुरक्षेतील त्रुटींशी संबंधित बातमीवर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप आहे.

पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांशी संपर्क आणि आरोपीच्या ऑनलाइन हालचालींचा एटीएसकडून तपास करण्यात येत आहे. अटक करण्यात आलेला मोहम्मद हसन अबू शरमद अख्तर हा बाईक रायडर आणि इत्र, अत्तर विक्रेता असल्याची माहिती समोर येत आहे. या व्यवसायाच्या आडून तो विखारी विचार पसरवत असल्याची माहिती समोर येत आहे. तो जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी जोडल्याचे समोर आले आहे. तो देशविघातक कारवायांमध्ये सक्रिय होता का, याचा तपास आता एटीएस करत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande