
नवी दिल्ली, 24 ऑक्टोबर (हिं.स.)। भारतीय जनता पक्षाचे (भाजप) ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी १ नोव्हेंबर रोजी दिल्लीतील रामलीला मैदानावर रॅली आयोजित करण्याच्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. हा निर्णय शीख समाजाच्या भावना दुखावणारा असल्याचे त्यांनी म्हटले. १ नोव्हेंबर हा दिवस १९८४ मधील शीखविरोधी दंगलींच्या वेदनादायी आठवणींशी जोडलेला आहे. अशा परिस्थितीत या तारखेला रॅली घेण्याचा हट्ट म्हणजे शीख समाजाच्या जखमांवर मीठ चोळण्यासारखे आहे. भाजप या कृतीचा तीव्र निषेध करतो, असे त्यांनी सांगितले.
भाजप मुख्यालयात शनिवारी पत्रकारांशी संवाद साधताना रविशंकर प्रसाद म्हणाले की, राहुल गांधी यांचे भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी राजकीय मतभेद असू शकतात. मात्र देशातील सामान्य नागरिक आणि व्यापाऱ्यांच्या चिंतांशीही त्यांना काही देणेघेणे नाही का? राहुल गांधी कोणाचेही म्हणणे ऐकण्यास तयार नसून आपल्या हट्टावर ठाम आहेत, असा आरोप त्यांनी केला.
१९८४ मधील शीखविरोधी दंगलींचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर देशात झालेल्या हिंसाचाराच्या आठवणी शीख समाज आजही तीव्र वेदनेने स्मरतो. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या त्या विधानाचाही त्यांनी उल्लेख केला, ज्यात त्यांनी म्हटले होते की, ‘जेव्हा मोठे झाड पडते, तेव्हा पृथ्वी हादरते.’
भाजप नेत्याने काँग्रेसवर आरोप केला की, पक्षाने दीर्घकाळ १९८४ मधील दंगलींचे सत्य दडपण्याचा आणि आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात भाजपचे सरकार आल्यानंतर दंगलींशी संबंधित प्रकरणांच्या तपासासाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना करण्यात आली, असे त्यांनी सांगितले. पीडित कुटुंबांना नुकसानभरपाई देण्यात आली आणि अनेक आरोपींना शिक्षा झाली, असाही उल्लेख त्यांनी केला.
रविशंकर प्रसाद म्हणाले की, दिल्लीतील व्यापाऱ्यांनीही राहुल गांधी यांना पत्र लिहून सणासुदीच्या काळातील खरेदी आणि व्यापारावर होणारा संभाव्य परिणाम लक्षात घेऊन रॅलीची तारीख बदलण्याची विनंती केली आहे. काँग्रेसच्या मित्रपक्षांमध्येही या तारखेबाबत असंतोष असल्याचा दावा त्यांनी केला. एकीकडे शीख समाजासाठी हा दिवस संवेदनशील आहे, तर दुसरीकडे व्यापारीही आपल्या चिंता व्यक्त करत आहेत. असे असताना राहुल गांधी रॅलीची तारीख बदलण्यास तयार का नाहीत, असा सवाल त्यांनी केला. राहुल गांधी यांना बेजबाबदार ठरवत ते जनहिताशी संबंधित मुद्दे आणि लोकांच्या भावनांचा आदर करत नसल्याचा आरोपही त्यांनी केला.
दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या परिसरात झालेल्या विरोध प्रदर्शनावरूनही भाजप नेत्याने काँग्रेसवर निशाणा साधला. उत्तर प्रदेश काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष आणि खासदार इम्रान मसूद यांच्या आंदोलनातील उपस्थितीवर प्रश्न उपस्थित करत ते तिथे काय करत होते आणि त्यांच्या उपस्थितीतून काय संदेश जात होता, असा सवाल त्यांनी केला.
प्रसाद यांनी दावा केला की, विद्यापीठाच्या परिसरातील भिंतींवर मोठ्या अक्षरांत ‘काश्मीरला आझाद करा’ आणि ‘शरजील इमामची सुटका करा’ अशा घोषणा लिहिण्यात आल्या होत्या. काँग्रेस अशा प्रकारच्या कृत्यांना पाठिंबा देते का आणि या प्रकरणात पक्षाची भूमिका काय आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. शरजील इमामचा उल्लेख करताना त्यांनी आरोप केला की, ईशान्य भारताला देशाच्या उर्वरित भागाशी जोडणारा चिकन नेक कॉरिडॉर तोडण्याबाबत तो बोलला होता. अशा घोषणा आणि कृत्यांबाबत काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट करावी, असे प्रसाद म्हणाले.
राहुल गांधी आणि काँग्रेसवर टीका करताना भाजप नेत्याने सांगितले की, राजकीय विरोध हा वेगळा मुद्दा आहे. मात्र देशाची एकता, अखंडता आणि सामाजिक सलोखा यांच्याशी संबंधित प्रश्नांवर स्पष्ट उत्तरे देणेही आवश्यक आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule